मुंबई : मुंबईतील हवामानाचा स्तर गेल्या काही दिवसापासून बिघडत चाललेला असला तरी गेल्यावर्षीप्रमाणे यंदा पालिकेने प्रदूषणावरील उपाययोजना करण्यास अद्याप सुरूवात केलेली नाही. गेल्याच आठवड्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकांच्या प्रमुखांशी एक बैठक आयोजित केली होती व उपयायोजना करण्याबाबत सूचनाही केल्या होत्या. मात्र या उपाययोजना करण्यासाठी निवडणुकीच्या कामामुळे मनुष्यबळच नसल्याची मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयातील स्थिती आहे. त्यामुळे प्रदूषण थांबवणाऱ्या उपाययोजना करण्यासाठी निवडणुकीनंतरचाच मुहूर्त मिळणार आहे. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत मुंबईकरांना प्रदूषित वातावरणाचा त्रास सोसावा लागणार आहे.
गेल्या दोन तीन वर्षांपासून हिवाळ्याची चाहूल लागताच मुंबईतील हवेचा स्तर बिघडत आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील हवेचा स्तर दिल्लीच्या हवेपेक्षाही वाईट झाला होता. त्यावेळी पालिकेने प्रदूषणावरील उपाययोजनांसाठी एक कृती आराखडा तयार केला होता. मात्र त्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करेपर्यंत एप्रिल महिना उजाडला. त्यानंतर गेल्यावर्षी २०२३ मध्येही पुन्हा एकदा हवेचा स्तर बिघडल्यामुळे दिवाळीपासूनच पालिकेने कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू केली होती. त्याकरीता विभाग कार्यालयांमध्ये पथके स्थापन करण्यात आली होती. गेल्यावर्षी प्रदूषणाचा मुद्दा न्यायालयात गेला होता. न्यायालयाने फटकारल्यानंतर पालिका प्रशासनाने प्रदूषण नियंत्रणासाठी नियमावलीही तयार केली होती. तसेच या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पथकेही स्थापन केली होती. यंदा मात्र विधानसभा निवडणुकीमुळे प्रदूषण उपाययोजनांना अद्याप सुरूवात झालेली नाही.
हेही वाचा >>>जात लोकांच्या नव्हे, तर पुढाऱ्यांच्या मनात! नितीन गडकरी यांचे मत
मुंबईतील हवेचा स्तर खालावण्यामागे धुळीचे प्रमाण जास्त असणे हे मूळ कारण आहे. ही धूळ बांधकामामुळे निर्माण होत असते. त्यामुळे बांधकामांच्या ठिकाणी विविध उपाययोजनाची नियमावली पालिका प्रशासनाने तयार केली होती. तसेच रस्ते धुण्यासही सुरूवात केली होती.
कार्यवाहीचा प्रश्न
● गेल्या आठवड्यात मुंबईतील काही भागात हवेचा स्तर अतिशय वाईट झाला होता. शिवडी, वरळी, बीकेसी, भायखळा या भागातील हवेची गुणवत्ता खालावली होती. याची दखल घेऊन गेल्या आठवड्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महानगरातील महापालिकांच्या प्रमुखांची एक बैठक बोलावली होती.
● या बैठकीत प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर पालिका प्रशासनानेही विभाग कार्यालयांना उपाययोजना सुरू करण्याचे व त्याकरीता पथके स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
● विभाग कार्यालयातील बहुतांशी कर्मचारी सध्या निवडणुकीच्या कामावर गेले असल्यामुळे या उपाययोजना सुरू करणे सहाय्यक आयुक्तांना अवघड झाले आहे.