शैलजा तिवले

७८४ रुग्ण अजूनही प्रतीक्षेत

औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगावर (एमडीआर व एक्सडीआर) प्रभावी असलेले आणि तब्बल ४० वर्षांनंतर शोधलेल्या ‘बेडाक्युलीन’ औषधाचा वापर सरकारी रुग्णालयांमध्ये संथगतीने सुरू आहे. हे औषध उपलब्ध असूनही गरजू रुग्णांना म्हणावा तसा फायदा होत नाही. राज्यभरात जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये ४११ रुग्णांना बेडाक्युलीनचे उपचार दिले असून यासाठी ७८४ रुग्ण अजूनही प्रतीक्षेत आहेत.

औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. एमडीआर किंवा एक्सडीआर रुग्णांना सध्याच्या उपचार पद्धतीमध्ये काही हजार गोळ्या आणि इंजेक्शन नियमितपणे दोन र्वष घ्यावी लागतात. त्यामुळे बऱ्याचदा रुग्ण कंटाळून उपचार अर्धवट सोडून देतात. तसेच या औषधांमुळे बहिरेपणा येणे, दृष्टी कमी होणे असे गंभीर दुष्परिणामही दिसून येतात. तेव्हा अशा रुग्णांना सध्या ‘बेडाक्युलीन’मुळे दिलासा मिळाला आहे. हे औषध पाण्यासारखे चवीचे असून तुलनेने कमी दुष्परिणामकारक आहे.

संशोधन प्रक्रियेमध्ये असल्याने २०१६ पासून हे औषध मुंबईत उपलब्ध करण्यात आले, तर गेल्याच वर्षी ते राज्यभरात उपलब्ध केले गेले. हे औषध सध्या केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच उपलब्ध आहे. राज्यभरात मुंबईमध्ये क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण असून सर्वात जास्त बेडाक्युलीन उपचार मुंबईतच दिले जातात. राज्यभरातील इतर जिल्हा रुग्णालयात मात्र इतक्या प्रभावीपणे ही मोहीम राबविली जात नसल्याचे आकडेवारीतून निदर्शनस येते. यवतमाळ, औरंगाबाद, नांदेड, सांगली, सिंधुदुर्ग येथे बेडाक्युलीन देण्यास रुग्णांची संख्या नोंद घेण्याइतपत असूनही ४० टक्के रुग्णांवरच उपचार झाले आहेत. पुणे, मिरा भाईंदर महानगरपालिकांमध्ये अनुक्रमे ४२ आणि १६ रुग्णांवर बेडाक्युलीनचे उपचार होऊ शकतात. मात्र पुण्यात केवळ तीन तर मिरा-भाईंदर महापालिकेत एकाच रुग्णाला उपचार दिले आहेत.

मुंबईमध्ये बेडाक्युलीनसाठी योग्य रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे ४४६ असून यातील २३६ रुग्णांवर उपचार सुरू झाल्याने दिसून येते. याबाबत अधिक माहिती देताना मुंबईच्या क्षयरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले, बेडाक्युलीनच्या उपचारासाठी योग्य असल्याचे समितीने संमती दर्शविली असली तरी प्रत्यक्ष श्वसनरोगाचे डॉक्टर तपासणी करून रुग्णाला हे औषध द्यायचे का याची पडताळणी करतात. रुग्णांना बाह्य़रुग्ण आणि आता खासगी आणि सार्वजनिक तत्त्वावरही औषध देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

खास अतिदक्षता विभागाची आवश्यकता

बेडाक्युलीन देण्यासाठी विशिष्ट चाचण्या करून देखरेख करावी लागते. यामध्ये रुग्णाच्या शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण कमी होणे असे दुष्परिणाम दिसून येतात. अशा वेळी रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचाराची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे दुष्परिणाम झाल्यास पुढे उपचार कसे करणार, असा प्रश्नही डॉक्टरांपुढे आहे. तसेच यासंबंधीचा अनुभवही गाठीशी नसल्याने हे उपचार देण्याचा आत्मविश्वासही अनेक डॉक्टरांकडे नाही. यासाठी अनुभवी डॉक्टरांच्या कार्यशाळा सुरू आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध असल्याने या रुग्णालयांनी अधिकाधिक रुग्णांना उपचार देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मात्र त्यांच्या अनास्थेमुळे रुग्णांना याचा फायदा मिळत नाही. सरकारने रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांसाठी खास अतिदक्षता विभाग सुरू करणे आवश्यक असल्याचे शताब्दी रुग्णालयाच्या एमडीआर क्षयरोग विभागाचे युनिट प्रमुख डॉ. विकास ओसवाल यांनी सांगितले.

शासकीय महाविद्यालयाचा कमी प्रतिसाद

सरकारी पातळीवर क्षयरोग उपचाराबाबत अनेक प्रयत्न सुरू असून डॉक्टरांसाठी कार्यशाळाही आयोजित केल्या जात आहेत. शासकीय महाविद्यालये यासाठी पुढाकार घेत नसल्याने अधिकाधिक रुग्णांपर्यंत या औषधाचा फायदा अजून पोहोचलेला नाही. सरकारने या रुग्णालयांना सूचना केल्या आहेत, असे राज्य क्षयरोग विभागाच्या प्रमुख डॉ. पद्मजा जोगेवार यांनी सांगितले.

Story img Loader