मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी समुद्रमार्गे कफ परेडमधील बधवार पार्क येथे उतरलेल्या दहशतवाद्यांपैकी एक अजमल आमीर कसाबला फाशी दिल्याचे समजताच या कोळीवाडय़ातील प्रत्येकाचे चेहरे समाधानाने उजळले. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे स्थानिक कोळी बांधवांच्या एका डोळ्यात दु:खाश्रू, तर कसाबला फाशी दिल्यामुळे दुसऱ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. त्यामुळे येथे जल्लोश झालाच नाही.
नेहमीप्रमाणेच आजही मच्छिमारीसाठी जाणाऱ्या कोळी बांधवांच्या लगबगीने बधवार पार्क जागे झाले. कोळी बांधव बोटी घेऊन खोल समुद्रात मच्छिमारीसाठी निघून गेले. महिलांनीही मासे विक्रीसाठी बाजारांची वाट धरली. उरलीसुरली मंडळी आपापल्या दैनंदिन कामात व्यस्त होती. त्याच वेळी कसाबला फाशी दिल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर झळकू लागले. अवघी मुंबापुरी या वृत्ताने सुखावली. सकाळी मच्छिमारीसाठी गेलेले मच्छिमार आणि मासे विक्रीसाठी बाजारात गेलेल्या महिला दुपारी १२ च्या सुमारास कोळीवाडय़ात परतत होते. कसाबच्या फाशीचे वृत्त समजताच त्यांचे चेहरे समाधानाने उजळत होते. कसाबबद्दल आपापसात कुजबूजत ही मंडळी घरची वाट धरत होते.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कसाब आणि त्याचे साथीदार बधवार पार्क बंदरावर उतरले. त्यावेळी बंदरावर काशिनाथ पाटील, भरत तांडेल, भरत तामोरे आदी मंडळी गप्पा मारत बसली होती. बंदरावर उतरलेल्या अनोळखी व्यक्तींना या मंडळींनी हटकले. परंतु त्यांना न जुमानता आपापल्या बॅगा घेऊन दहशतवादी मुंबईत नियोजित स्थळी निघून गेले आणि काही मिनिटांनी मुंबई हादरली. समुद्रामध्ये एक रबरी बोट तरंगताना मच्छिमार प्रशांत धानूरच्या निदर्शनास आली. त्याने ती बधवार पार्क बंदरावर आणली आणि पोलिसांच्या स्वाधीन केली.
मात्र या घटनेनंतर बधवार पार्कच्या मागे संकटांचा ससेमिराच लागला. मच्छिमारांठी स्मार्टकार्ड योजना सुरू करण्यात आली. मच्छिमारीसाठी जाताना स्मार्टकार्ड सोबत नेण्याची सक्ती करण्यात आली. तपासणीमध्ये हे कार्ड जवळ न बाळगणाऱ्याची रवानगी थेट पोलीस ठाण्यात करण्यात आली. तसेच त्यांच्यावर २५०० रुपये दंडही आकारण्यात आला. मच्छिमारीसाठी जाणाऱ्या खलाशांमध्ये अन्यप्रांतीयांची संख्या अधिक आहे. त्यांना स्मार्टकार्ड मिळणे अशक्य होते. त्यामुळे मच्छिमार सवरेदय सहकारी सोसायटीने पोलिसांच्या परवानगीने या खलाशांना तात्पुरते ओळखपत्र दिले. मात्र तरीही अधूनमधून मच्छिमारी करताना पोलीस आणि तटरक्षक दलाच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येथील मच्छिमारांवर आली, अशी खंत मच्छिमार सवरेदय सहकारी सोसायटीचे संचालक परशुराम मेहेर यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब ठाकरे हे आमचे अराध्यदैवत आहे. त्यांचे निधन होऊन चारच दिवस लोटले आहेत. कसाबला फाशी दिल्याची आनंदवार्ता समजली असली तरी बधवार पार्क आनंदोत्सव साजरा करण्याच्या मन:स्थितीत नाही, असेही ते म्हणाले.
मंगळवारी अचानक संध्याकाळी बधवार पार्कवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. विचारणा केली असता नेहमीप्रमाणे बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. परंतु वाढविण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तामागील कोडे आज उलगडले असे येथील स्थानिक रहिवाशी सांगत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा