मुंबई : बदलापूर येथे उसळलेल्या जनक्षोभाचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराशी आक्षेपार्ह भाषेत संभाषण करून विनयभंग केल्याचा आरोप असलेले शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी अटकेपासून चार दिवसांसाठी अंतरिम संरक्षण दिले.

महिला पत्रकाराविरुद्ध म्हात्रे यांनी केलेले कथित वक्तव्य हे तिला जातीवरून अपमानस्पद वागणूक देण्याच्या दृष्टीने नव्हते, असे सकृतदर्शनी दिसून येत असल्याचे मत न्यायालयाने त्यांना तात्पुरते अंतरिम संरक्षण देताना व्यक्त केले.

हेही वाचा…मुंबईत वर्षभरात विनयभंगाच्या दोन हजारांहून अधिक घटना

बदलापूर येथील दोन बालिकांच्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ जनक्षोभ उसळला होता. त्यावेळी, या जनक्षोभाचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराशी अर्वाच्य संभाषण केल्याप्रकरणी म्हात्रे यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक (अॅट्रॉसिटी) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, म्हात्रे यांनी अटक टाळण्यासाठी कल्याण सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने २९ ऑगस्ट रोजी म्हात्रे यांना अटकपूर्व जामीन नाकारला. त्यामुळे, म्हात्रे यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली.