बदलापूर पालिकेच्या जुन्या कार्यालयाजवळील फवारणी औषध साहित्य ठेवण्यात आलेल्या गोदामाला गुरुवारी भीषण आग लागली. आगीत भस्मसात झालेल्या औषधांमुळे परिसरात विषारी वायु आणि धुर पसरल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आग तातडीने आटोक्यात आणून जवळच असलेले भूमी अभिलेख कार्यालय आगीपासून वाचवले.
बदलापूर पूर्वला पालिकेच्या जुन्या कार्यालयाजवळ पालिकेचे गोदाम असून यामध्ये जंतुनाशक फवारणीच्या औषधांचा साठा ठेवण्यात आला आहे. या गोदामाला गुरुवारी सकाळी ८ वाजता आग लागली. दरम्यान, गोदामातील औषधांमुळे  विषारी वायु आणि धूर बाहेर पडू लागला. त्यामुळे पाटील पाडा, स्टेशन पाडा, आदी परिसरातील नागरिकांना डोळे चुरचुरणे, उलटी, डोकेदुखी, असा त्रास होऊ लागला. या आगीबाबत माहिती मिळताच पालिका अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. आग विझविण्यासाठी सुमारे दोन तासांचा अवधी लागला. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र हे कारण शोधण्यसाठी पुढील तपास सुरू आह़े

Story img Loader