मुंबई : बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंगळवारी सकाळी जे. जे. रुग्णालयात आणण्यात आला होता. अक्षयच्या डोक्यात गोळी लागून झालेल्या रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथामिक शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.
अक्षयचा मृतदेह सकाळी जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. कागदोपत्री कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायवैद्यक शास्त्र विभागातील डॉक्टरांनी मृतदेहाचे क्ष किरण काढले. न्यायवैद्यक शास्त्र विभागातील चार ते पाच वरिष्ठ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये अक्षयच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करताना चित्रीकरण करण्यात आले. व्हिसेराचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.