मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरूवारी महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले. त्यात बदलापूर अत्याचार प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे-शिंदे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या बदलीसाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी मागवण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्यातील २२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई पोलीस दलात १४ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. ठाणे शहर येथील अजय आपळे, नंदकुमार कैचे, गंगाराम वळवी, महादेव कुंभार, स्वाती पेटकर, अशोक भगत, चंद्रहार गोडसे, अनिल पडवळ, अनिल जगताप, संदीप धांडे, अतुल अडुरकर तर नवी मुंबईतील विजयकुमार पन्हाळे व संजीव धुमाळ यांची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा…‘मंकीपॉक्स’साठी सेव्हन हिल्स रूग्णालयात १४ खाटांचा स्वतंत्र कक्ष आरक्षित, मुंबईमध्ये एकही रूग्ण नाही

बदलापूर येथील पोलीस ठाण्यातील निलंबीत पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे-शिंदे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे. याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली सरवदे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे.