मुंबई : बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला सोमवारी पोलीस चकमकीत ठार करण्यात आले. या चकमकीविरोधात शिंदे याच्या वडिलांनी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच, पुरावे नष्ट करण्याची भीती व्यक्त करून याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. न्यायालयानेही याचिकेची दखल घेऊन बुधवारी सकाळच्या सत्रात प्रकरणाची सुनावणी ठेवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्य न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर शिंदे याच्या वडिलांच्यावतीने याचिका सादर केली. न्यायालयाने त्यांच्या वकिलाचे थोडक्यात म्हणणे ऐकल्यानंतर याचिका तातडीच्या सुनावणीसाठी बुधवारी ठेवली. या प्रकरणातील मूळ आरोपींना वाचविण्यासाठी अक्षयला चकमकीत ठार करण्यात आल्याचा आरोप करून या चकचकीबाबतचे पुरावे नष्ट करण्याची भीती शिंदे याच्या वकिलांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा : Akshay Shinde Encounter: डोक्यात गोळी लागल्याने रक्तस्त्राव होऊन अक्षयचा मृत्यू

दरम्यान, संबंधित शाळेचे अध्यक्ष आणि सचिव यांनी अटकपूर्व जामिनासाठी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, अटकेपासून दिलासा देण्याची मागणी केली. न्यायालयाने मात्र त्यांना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला व त्यांच्या याचिकेवरील सुनावणी १ ऑक्टोबर रोजी ठेवली.

मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी शिंदेचा बळी ?

या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या कथित चकमकप्रकरणी मंगळवारी माजी पत्रकार केतन तिरोडकर यांनीही याचिका दाखल केली. त्यात त्यांनी बदलापूर येथील संबंधित शाळेच्या विश्वस्तांवर मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा दावा केला आहे. तसेच, लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा गुन्हा नोंदवल्याच्या दुसऱ्याच दिवशी शाळेतून आणखी एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच पोलीस ठाण्यात दाखल केल्याचा दावाही तिरोडकर यांनी याचिकेत केला आहे. याप्रकरणात काही बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे, प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा, अशी मागणी याचिकेत केली आहे. शिवाय, शिंदे याने कारागृहात असताना माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांना भेटण्याची इच्छा पोलिसांकडे बोलून दाखवली होती. आरोपी न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष समितीपुढे हजर झाल्यास प्रकरण वेगळ्याच वळणार जाईल, या भीतीपोटी चकमकीत त्याला मारण्यात आल्याचा आरोपही याचिकाकर्त्याने केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur sexual assault case akshay shinde s father in high court against encounter mumbai print news css