लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: कोकणच्या किनाऱ्यावर सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात आलेल्या ‘बागेश्री’ आणि ‘गुहा’ या दोन ऑलिव्ह रिडले कासवांपैकी एक बंगालच्या उपसागरापर्यंत जाऊन पोहोचले आहे. ‘बागेश्री’ कासविणीने ७ महिन्यांत तब्बल ५ हजार किलोमीटर प्रवासाचा पल्ला गाठला आहे. दरम्यान, सॅटेलाइट ट्रान्समीटरचा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पहिल्यांदाच प्रयोग करण्यात आला असून मॅनग्रोव्ह सेल आणि वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी एकत्रितपणे हा प्रकल्प हाती घेतला आहे.
‘बागेश्री’ ही कासवीण फेब्रुवारी २०२२ मध्ये अंडी घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरच्या किनाऱ्यावर आली होती. त्यावेळी तिला सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात आले आणि त्यानंतर तिच्या समुद्रातल्या प्रवासाचा माग ठेवण्यात येऊ लागला. बागेश्री या मादी कासवाला सॅटेलाइट ट्रान्समीटर लावून लगेच समुद्रात सोडण्यात आले होते. त्यानंतर तिने अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ आणि कन्याकुमारीच्या किनाऱ्यालगत प्रवास केला. जुलै महिन्यात बागेश्रीने श्रीलंकेपर्यंत मजल मारली. श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत हिंदी महासागरात ती बरेच दिवस होती. त्यानंतर बंगालच्या उपसागराच्या मार्गावर तिचा प्रवास सुरू झाला. दरम्यान, बागेश्री आता पुन्हा बंगालच्या उपसागरातून श्रीलंकेकडे वळली आहे.
आणखी वाचा-शिवसेना ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश
ऑलिव्ह रिडले कासवांचा जन्म ज्या किनाऱ्यावर होतो त्या किनाऱ्याची नोंद त्यांच्या मेंदूत होते. जेव्हा ती मोठी होतात तेव्हाही ती त्याच किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. यामुळेच बागेश्री आणि गुहा पुढच्या हंगामात गुहागरच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येऊ शकतात, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.