Bageshwar Dham Sarkar: बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या युवासेनेकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. बागेश्वरबाबांनी शिर्डीच्या साईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच अनुषंगाने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. बागेश्वर बाबांवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. बागेश्वर बाबा हे साईभक्तांच्या भावनांशी खेळत आहेत असाही आरोप युवासेनेने केला आहे.
बागेश्वर धाम सरकार विरोधात ही तक्रार मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. युवासेनेचे नेते आणि शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त यांनीही धीरेंद्र शास्त्रींवर साईभक्तांच्या भावना जाणीवपूर्वक दुखावल्याचा आरोप केला आहे. तसंय या प्रकरणी FIR नोंदवली जावी अशीही मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. त्यामुळे आता धीरेंद्र शास्त्री नेमकं काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
धीरेंद्र शास्त्रींनी नेमके काय म्हटले होते?
जबलपूर येथे धीरेंद्र शास्त्रींनी भाविकांशी संवाद साधला. त्यावेळी एका भाविकाने साईबाबांची पूजा केली पाहिजे की नाही, असा सवाल धीरेंद्र शास्त्रींना विचारला. त्यावर “लांडग्याचे कातडे पांघरून कोणी सिंह होत नाही,” असं उत्तर धीरेंद्र शास्त्री यांनी दिलं.
शंकराचार्यांनी साईबाबांना देवाचे स्थान दिलेले नाही. शंकराचार्यांचे मत हे बंधनकारक आहे. शंकराचार्य हे सनातनी धर्माचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे प्रत्येक सनातनी धर्माने त्यांचे ऐकले पाहिजे. कोणतेही संत असतील, मग ते आपल्या धर्माचे का असेना, ते देव होऊ शकत नाहीत. गोस्वामी तुलसीदास किंवा सूरदास असो, हे सर्व संत आहेत. काही महापुरुष आहेत, काही युगपुरुष आहेत, तर काही कल्पपुरुष आहेत. पण, यात देव कोणीही नाही,” असं धीरेंद्र शास्त्रींनी म्हटले.