विधानभवन परिसरात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले आमदार राम कदम आणि क्षितीज ठाकूर यांना महानगरदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी अखेर प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. मात्र त्याचवेळी तपास पूर्ण होईपर्यंत प्रत्येक बुधवारी दोघांनीही सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत गुन्हे अन्वेषण विभागासमोर हजेरी लावावी, अशी अट न्यायालयाने त्यांना घातली आहे.
दोघांच्या कोठडीची सध्या तरी आवश्यकता नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्यावर न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला. एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर शुक्रवारी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच कदम आणि ठाकूर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.
मारहाण झालेला पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी हा आरोपींना ओळखण्याच्या स्थितीत नसल्याने पोलीस कोठडीऐवजी दोघांनाही न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती.
या पाश्र्वभूमीवर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करताना त्यांच्या जामीन अर्जावरील निर्णयही राखून ठेवला होता.

Story img Loader