मुंबई : सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) विशेष न्यायालयाने सहारा प्रमुख सुब्रत रॉय यांचा वैद्यकीय कारणास्तव न्यायालयात हजर राहण्यास सूट देण्याची मागणी करणारा अर्ज नुकताच फेटाळला. तसेच रॉय यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावले. ‘सेबी’च्या वकिलांच्या तोंडी मागणीनंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एस. गायके यांनी रॉय यांना २५ हजार रुपयांचे जामीनपात्र अटक वॉरंट बजावले. तथापि, रॉय यांची बाजू मांडणारे अधिवक्ता हर्षद पोंडा आणि अशोक सरोगी यांनी उच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान द्यायचे असल्याचे न्यायालयाला सांगितल्यानंतर न्यायालयाने आपला आदेश आठवडाभरासाठी स्थगित केला.
हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर!
‘सेबी’ने २०१४ मध्ये सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, सहारा इंडिया रिअल इस्टेट लिमिटेड आणि इतरांविरुद्ध नोंदवलेल्या तक्रारीप्रकरणी विशेष न्यायालयाने रॉय यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र रॉय यांना करोना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना वैद्यकीय समस्या उद््भवल्याचा दाखला देत रॉय यांना न्यायालयात गैरहजर राहण्याची मुभा देण्याची विनंती त्यांच्या वकिलांनी केली. रॉय यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे सर्वज्ञात आहे. त्यांच्या वैद्यकीय स्थितीबाबत सहारा रुग्णालयाने प्रमाणपत्रही दिल्याचे रॉय यांच्या वकिलाने सांगितले. रॉय यांच्या अर्जाला ‘सेबी’च्या वकिलांनी विरोध केला.
दोन्ही बाजू ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाने उच्च न्यायालयाने रॉय यांचा प्रकरणातून दोषमुक्त करण्याची याचिका निकाली काढताना दिलेल्या आदेशाचा दाखला दिला. त्यानुसार, रॉय यांना प्रकरणाच्या नियोजित सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिल्याचे आणि रॉय यांनीही त्याबाबत न्यायालयाला हमी दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने रॉय यांचा सुनावणीला गैरहजर राहण्याचा अर्ज फेटाळला.