आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत भरणाऱ्या प्रदर्शनांबद्दल आणि कलादालनांबद्दल हे सदर असलं, तरी यंदाच्या आठवडय़ात ‘एटीएममध्ये जाऊ की कलाप्रदर्शनं पाहू?’ असा प्रश्न कुणाला पडत असल्यास काही चूक नाही. प्रश्न पडत असतातच. अनेकदा, अनेक प्रश्न पडतात. त्यापैकी काही प्रश्न जाहीरपणे विचारल्यास ‘देशभक्त’ आणि ‘देशद्रोही’, किंवा ‘सज्जन’ आणि ‘दुर्जन’ अशी थेट या नाही तर त्या टोकाची उत्तरंही मिळत असतात. पण काही प्रश्नांना अशी टोकाची किंवा ‘काळय़ाचं काळं आणि पांढऱ्याचं पांढरं’ या थाटाची उत्तरं नसतात. काळा आणि पांढरा हे तांत्रिक अर्थानं ‘रंग’ नाहीत, असं चित्रकलेच्या सिद्धान्तांची पुस्तकं सांगतात. मग ते काय आहेत? त्या ‘छटा’ आहेत. रंगांऐवजी छटा, हा फरक नावापुरताच म्हणावा का? तसंही नाही. कोणत्याही एखाद्या (उदाहरणार्थ हिरव्या, लाल) रंगात काळी ‘छटा’ किती आणि पांढरी ‘छटा’ किती, यानुसार तो रंग बदलतोच; शिवाय काळय़ा छटेची तीव्रता किती, यावरही बरंच काही अवलंबून असतं. हल्ली फेसबुकवर वगैरे काहीजण स्वतचे फोटो मुद्दाम कृष्णधवल करून मग दाखवताहेत, हे आपण पाहातो. रंगीत फोटोंपेक्षा असा काळापांढरा फोटो लक्ष वेधून घेतो, तेव्हा त्यातल्या ‘काळा’ आणि ‘पांढरा’ यांच्या मधल्या छटांचा खेळच आपल्याला आवडलेला असतो. पण काळय़ापांढऱ्या छायाचित्रांना जो इतिहास आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या सौंदर्यकल्पनांना जी सहजता आहे, तशी चित्रांना आहे का? काही प्रमाणात आहे. पण रेखाचित्रं, ‘पावडर शेडिंग’च्या तंत्रानं केलेली चित्रं यांच्या त्या इतिहासाच्या कितीतरी पुढे गेल्या सव्वाशे वर्षांतली चित्रकला गेलेली आहे. हे सारं लक्षात येण्याचं, किंवा स्वतलाच उमगण्याचं ठिकाण म्हणजे नरीमन पॉइंट भागातल्या बजाज भवनाच्या तळमजल्यावरल्या  ‘बजाज आर्ट गॅलरी’तलं ‘कृष्ण-धवल’ या नावाचं प्रदर्शन!

मनोजकुमार सकळे, आसिफ शेख, प्रकाश घाडगे, विप्ता कपाडिया, अशोक भौमिक, विनोद शर्मा आदी ११ चित्रकारांच्या कलाकृती इथं आहेत. यापैकी विप्ता कपाडिया अमूर्तवादी,  तर आसिफ शेख हा परिचित आकारांचं अमूर्तीकरण करणारा चित्रकार, विनोद शर्मा हे तंत्र-परिणामांतून निसर्गदृश्यं साकार करणारे, तर प्रकाश घाडगे हे अगदी काटेकोरपणे केवळ काळे ठिपके आणि रेघा यांतूनच निसर्ग, व्यक्ती, मानवाकृती, अलंकारिक आकार हे सारं साकार करू शकणारे. मनोजकुमार सकळे यांची चित्रंही तंत्रशुद्ध आणि काटेकोर आहेत, पण हा तरुण चित्रकार आता तांत्रिक सफाईच्या पुढला टप्पा गाठतो आहे. अशोक भौमिक हे बंगालची म्हणावी अशा शैलीचं प्रतिनिधित्व करणारे. त्यांनी रंगचित्रांसारखीच चित्रं केली असून त्यात रंगांऐवजी काळा-पांढऱ्याच्या अनंत छटा आहेत. कृष्णधवल चित्रांमध्ये या छटाच अनेक परिणाम घडवून आणतात : कधी दोन आकारांच्या मधलं अंतर दाखवतात, कधी आकाराची गोलाई किंवा घनता प्रतीत करतात, तर कधी पोतनिर्मिती करतात. हे सारं या प्रदर्शनात, अमूर्त भासणाऱ्या चित्रांमधूनही प्रत्ययाला येईल.

काळा आणि पांढरा अशी दोन टोकं पाहून काहीच साधणार नाही. छटांचीच ही टोकं आहेत हे मान्य, पण त्या दोन टोकांच्या मधल्या अगणित छटा आहेत, म्हणूनच सौंदर्य आहे. त्या छटा नसतील, या प्रत्येक छटेचं वैशिष्टय़ आणि वैविध्य नसेल, तर सारंच छायाप्रतीसारखं (रूढ शब्दांत ‘झेरॉक्स कॉपी’सारखं) दिसू लागेल. एवढं जरी हे प्रदर्शन पाहाताना वाटलं, तरी ‘कोबाल्ट आर्ट्स’नं ‘बजाज आर्ट गॅलरी’मध्ये घडवून आणलेलं हे प्रदर्शन सार्थकी लागलं, असं म्हणता येईल.

शैलीपल्याडचं सिंहावलोकन

हैदराबाद आणि बडोद्यात १९७० च्या दशकारंभी शिकलेले, १९४२ साली जन्मलेले आणि चित्रकार तसंच ज्येष्ठ मुद्राचित्रकार (प्रिंटमेकिंग कलावंत) म्हणून ओळखले जाणारे थोटा वैकुंठम यांच्या कलाकारकीर्दीला आता ४५ र्वष झाली आहेत. त्या निमित्तानं ‘इंडिया फाइन आर्ट्स’नं आपल्या ‘जहांगीर आर्ट गॅलरी’चा अख्ख्या तळमजलाभर (म्हणजे वातानुकूल दालनांचे तीन्ही भाग, शिवाय सभागृह दालनसुद्धा) वैकुंठम् यांच्या चित्रप्रवासाचं दर्शन घडवणारं सिंहावलोकनी प्रदर्शन मांडलं आहे. वैकुंठम  हे अलीकडे अगदी एकाच शैलीतल्या चित्रांसाठी ओळखले जातात आणि ओळखू येतात. तेलंगणी पद्धतीचं रंगबिरंगी लुगडं नेसलेल्या पुरंध्री, धोतर-मुंडासं आदी पारंपरिक पोशाखातले पुरुष आणि त्यांच्या आसपास टोपली, शेतीची अवजार, पोपटासारखे पक्षी.. हाच ‘कच्चा माल’ वापरून भरपूर उत्पादन वैकुंठम यांनी काढलं.. त्याला कलाबाजारात

मागणीही फार वाढली. पण तोचतोपणा इतका की, वैकुंठम हे कुणाला कंटाळवाणे वाटू लागल्यास क्षम्य मानावं..

हा तोचतोपणा नव्हता तेव्हा काय होतं, हेही या प्रदर्शनात दिसतं; त्यामुळे हे प्रदर्शन प्रेक्षणीय आहे!

चित्रातल्या मानवाकृतींच्या अंगाचा भरडपणा,  हा वैकुंठम यांच्या सौंदर्यदृष्टीचा अविभाज्य भाग आहे. त्यांची चित्रं कितीही ‘तीच ती’ असली तरी त्या चित्रांमधला देशीपणा नाकारताच येत नाही. हे सारं आधीपासूनच त्यांच्याकडे होतं, हे सांगणारी काही चित्रं इथं आहेत. त्या चित्रांमधले कपडय़ांचे रंगही आवर्जून पाहा. आज परिचयाची झालेल्या अलंकारिक शैलीऐवजी निराळी, जाड रेषा आणि जोरकस रंगलेपनाला प्राधान्य देणाऱ्या आधुनिकतावादी शैलीचा अवलंब तरुणपणी वैकुंठम यांनी केला होता, तेव्हासुद्धा स्वतच्या सौंदर्यकल्पना त्यांनी सोडल्या नव्हत्या, हे पाहून बरं वाटेल.. त्याच वेळी, ‘शैली’चा नवा अर्थही कदाचित कळू लागेल.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajaj art gallery krush dhawal exhibition