बाजीराव खाडे, सचिन नाईक यांची चिटणीसपदी नियुक्ती
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या चमूमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्य़ातील बाजीराव खाडे तसेच यवतमाळच्या सचिन नाईक यांची अ. भा. काँग्रेस समितीच्या चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
प्रियंका यांच्या मदतीसाठी बाजीराव खाडे, आशीष कुमार आणि झुबेर खान या तीन सचिवांची नियुक्ती केली होती. मात्र बिहार युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आशीष कुमार यांच्याबद्दल तक्रारी असल्याने, तसेच त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. त्यांच्या जागी सचिन नाईक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये संघटना बळकट करण्याच्या उद्देशाने सहा चिटणीसांची पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी नियुक्ती केली आहे. यामध्ये नव्याने सरचिटणीसपदी नियुक्त झालेल्या प्रियंका गांधी यांच्या मदतीला तीन चिटणीसांची निवड करण्यात आली आहे. खाडे यांच्या नियुक्तीची घोषणा होताच राज्यातील काँग्रेस नेते ‘कोण हे खाडे’ याची चौकशी करू लागले.
राहुल गांधी यांच्या कारकीर्दीत चिटणीसपदी नियुक्ती झालेले खाडे हे राज्यातील सहावे चिटणीस आहेत. आमदार वर्षां गायकवाड, अमित देशमुख, हर्षवर्धन सकपाळ, यशोमती ठाकूर आणि माजी आमदार संजय दत्त हे चिटणीसपदी आहेत. मुकुल वासनिक आणि अविनाश पांडे हे राज्यातील दोघे सरचिटणीस आहेत.
निष्ठावंत कार्यकर्त्यांला संधी
मितभाषी असलेले ४५ वर्षीय खाडे हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. एम.एस्सी. (कृषी), एमबीए असे उच्चविद्याभूषित असलेल्या बाजीरावांनी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली. स्थानिक राजकारण, सहकार क्षेत्रात त्यांनी काम केले असले तरी त्यांच्या कामाचा ठसा हा काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीत दिसून आला आहे. मध्य प्रदेशातील लोकसभा आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. काँग्रेसच्या पंचायत राज समितीवर काम केले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यात त्यांनी या समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम केले होते.
माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्यांकडे पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. उत्तर प्रदेशातील जबाबदारी आव्हानास्पद असली तरी तेथे काँग्रेसला भरघोस यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात येईल.
– बाजीराव खाडे, काँग्रेस नेते