जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी हिमायत बेग याला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी येत्या सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार आहे. न्या. व्ही. के. ताहिलरमाणी आणि न्या. मृदूला भाटकर यांच्या खंडपीठामध्ये हिमायत बेगला सुनावण्यात आलेली फाशीच्या शिक्षेची निश्चिती आणि शिक्षेविरोधात त्याने दाखल केलेल्या याचिकेवर एकत्रितपणे सुनावणी होईल.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील दोषी बेगला गुरुवारी कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. खटल्याच्या प्रत्येक सुनावणीवेळी बेगला न्यायालयात आणावे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारागृहातून त्याला सुनावणीमध्ये सहभागी करून घ्यावे, यावर न्यायालय सोमवारीच निर्णय देणार आहे.
१३ फेब्रुवारी २०१०मध्ये पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात १७ जण मृत्युमुखी पडले होते आणि ५८ जण जखमी झाले होते. पुण्यातील सत्र न्यायालयाने गेल्या एप्रिलमध्ये बेगला दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावली होती.