मुंबई : लाकूड आणि कोळसा वापरून त्यावर चालणाऱ्या बेकऱ्या स्वच्छ इंधनावर रुपांतरित करणे अतिशय अवघड असून त्याकरीता कठोर कारवाई केल्यास बेकरी उद्योग संकटात येईल अशी भीती बेकरी व्यवसायिकांच्या संघटनेने व्यक्त केली आहे. तसेच लाकडाऐवजी विद्युत किंवा गॅस वापरणे हे खर्चिक आणि धोक्याचे असल्याचेही मत या संघटनेने व्यक्त केले आहे. तसेच बदल करण्यासाठी महिनाभर बेकरी बंद ठेवावी लागणार असल्याचे गाऱ्हाणेही व्यावसायिकांनी मांडले आहे.

लाकूड व कोळसा यांचा इंधन म्हणून उपयोग करणा-या भट्टी (बेकरी), हॉटेल्स्, उपाहारगृहे हे देखील वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने देखील ९ जानेवारी २०२५ रोजी घेतलेल्या सुनावणीच्यावेळी सहा महिन्यांच्या मुदतीत लाकूड व कोळसा इंधन आधारीत व्यावसायिकांनी पर्यायी स्वच्छ इंधनाचा अवलंब करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने या सर्व व्यावसायिकांना ८ जुलै २०२५ ची मुदत दिली आहे, तशा नोटीसाही पाठवल्या आहेत. या निर्णयामुळे बेकरी व्यावसायिक संकटात आले असून इंडिया बेकर्स असोसिएशनने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना पत्र लिहून या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

मुंबईतील लाकडावर चालणाऱ्या बेकऱ्या या अनेक दशकांपासून सुरू आहेत. काही बेकऱ्या या शंभर वर्षे जुन्या आहेत. घुमटाकार आकाराच्या या भट्टया विटांपासून तयार केलेल्या असतात व त्या लाकूड जाळण्याच्या सुविधेप्रमाणेच बनवलेल्या आहेत. सुमारे दीडशे चौरस फूट जागेत बनवलेल्या या भट्ट्यांमध्ये लाकूड जाळले जाते. लाकूड जळून पूर्ण झाले की त्याचा कोळसा होतो व त्या कोळशाच्या तापमानावर ही भट्टी गरम राहते. त्यामुळे लाकूड जाळण्याची प्रक्रिया ही केवळ अर्धा ते दोन तास एवढीच असते, असे मत बेकरी संघटनाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.

ही भट्टी स्वच्छ इंधनावर रुपांतरित करण्याचे ठरवल्यास दिवसाला १० सिंलिंडर लागू शकतात, त्यामुळे सुमारे तीन दिवस पुरेल इतका साठा करून ठेवावा लागेल जे धोक्याचे ठरेल असेही मत या बेकरी मालकांनी व्यक्त केले आहे. विजेवर भट्टी चालवल्यास त्याचा मासिक खर्च परवडणारा नाही. तर पीएनजीवर भट्टी चालवायची झाल्यास अशा गॅसवाहिन्यांचे जाळे मुंबईत सर्वत्र नाही. त्यामुळे ते देखील शक्य होणार नाही. स्वच्छ इंधनात भट्टीचे रुपांतर करण्यासाठी बेकरी मालकांना किमान १० ते १५ लाखांचा खर्च येणार आहे. त्यामुळे सहा महिन्यांच्या कालावधीत हे सारे शक्य होणार नाही, तसेच या खर्चासाठी सरकारने अनुदान द्यावे अशी मागणी बेकरी मालकांनी केली आहे.

पावाच्या उत्पादनावर परिणाम ?

पाव हे मुंबईकरांचे मुख्य खाद्य असून त्याच्या उत्पादनावर या निर्णयाचा परिणाम होईल, अशीही भीती बेकरी मालकांच्या संघटनेने केली आहे. भट्ट्या रुपांतरित करण्यासाठी एक महिना उत्पादन बंद ठेवावे लागेल. त्यात बेकरी मालकाचे नुकसान होईलच पण मुंबईतील पावाच्या उत्पादनावर परिणाम होईल, अशीही भीती व्यक्त केली आहे.

Story img Loader