प्रभाग क्र. १९(दूधनाका)चे नगरसेवक बाळ हरदास यांचे नगरसेवकपद रद्द करण्यास कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत हरदास यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.  या याचिकेवर सोमवारी (ता.१७) उच्च न्यायालयात  सुनावणी होणार आहे.
न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. आर. डी. धानुका यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.हरदास यांचे ऑक्टोबर २०१० च्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार सुलेख डोन, तसेच दक्ष नागरिक कौस्तुभ गोखले यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत बाळ हरदास, पालिका आयुक्त व लोकनियुक्त प्रतिनिधी, राज्य निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य सचिव, जात पडताळणी समिती, कोकण विभाग यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
मुंबई आणि कल्याण-डोंबिवली पालिकेतील अनुक्रमे विश्वनाथ महाडेश्वर आणि राजेंद्र देवळेकर हे पालिका निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गातून(ओबीसी) वैश्य वाणी या जाती प्रवर्गातून निवडणूक लढवून विजयी झाले होते. वैश्य वाणी ही जात ‘ओबीसी’ संवर्गात मोडत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने महाडेश्वर व देवळेकर यांची नगरसेवक पदे रद्द केली आहेत. हरदास हेही वैश्य वाणी जातीचे असून त्यांनी ओबीसी संवर्गातून निवडणूक लढविली आहे. त्यामुळे देवळेकर व महाडेश्वर यांचाच निर्णय हरदास यांना लागू होत असल्याचे पालिकेच्या निवडणूक विभागाने गोखले यांना माहितीच्या अधिकारात लिहून दिले आहे. परंतु,न्यायालयाचा आदेश नसल्याने त्यांच्यावर कारवाई करता येत नसल्याचेही स्पष्ट केले.
आयुक्त, महापौरांकडून हेतुपुरस्सर या विषयाबाबत निर्णय घेण्यात येत नसल्याने अखेर डोन व गोखले यांनी मुंबई उच्च न्यायालयात (याचिका क्र. ३४१७९/१२) याचिका दाखल केली आहे. गेल्या दोन वर्षांत पालिकेने हरदास यांना दिलेले मानधन, भत्ते वसूल करण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

Story img Loader