‘बाळासाहेब मातोश्रीवरून निघाले आहेत, काही वेळातच ते पोहोचतील’, असे जाहीर झाले, की मैदानावर उसळलेल्या अलोट जनसमुदायाला उत्साहाचे उधाण यायचे, हा शिवतीर्थाचा आजवरचा अनुभव! रविवारी मात्र, लाखो चाहत्यांसमवेत बाळासाहेब मातोश्रीवरून निघाल्याचे कळूनही शिवतीर्थावरचा जनसमुदाय उत्साहाने उसळलाच नाही.. उलट दुखाची कळ मनामनावर उमटली.. चार दशकांहून अधिक काळ बघितलेले बाळासाहेबांचे सळसळते चैतन्य मात्र हरपलेले पाहून शिवतीर्थावरील संध्याछाया आणखीनच गडद झाली. सूर्यानेही पश्चिमेकडच्या समुद्रात दडी मारली.. बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या घोषणा रविवारीही घुमत होत्या, पण त्या सुरात टाहो आणि वेदना दडली होती. सकाळी नऊ वाजता मातोश्रीवरून निघालेले बाळासाहेब संध्याकाळी पाच वाजता शिवतीर्थावर आले, आणि व्याकुळ झालेला जनसागर अक्षरश हेलावून गेला.. डोळ्यादेखत उजळलेल्या एका पर्वाला शिवतीर्थाने रविवारी अखेरचा निरोप दिला.

सरकारी इतमामात राष्ट्रध्वज बाजूला झाल्यानंतर बाळासाहेबांच्या पार्थिवावर भगवे वस्त्र पांघरण्यात आले.. पोलिसांनी अखेरची मानवंदना दिली, हवेत बंदुकीच्या फैरी झडल्या आणि श्रद्धांजलीची धून वाजू लागताच शिवतीर्थावरील लाखोंचा समुदाय नि:शब्द झाला.. मावळतीच्या सूर्यानेही पश्चिमेकडच्या सागरात दडी मारली.. आणि ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेबांच्या ज्वलंत शब्दांच्या ठिणग्या मनात साठवत आजवर हजारो शिवसैनिक घरी परतले, त्याच शिवतीर्थावर अश्रूंचा सडा शिंपत त्याच शिवसैनिकांनी आपल्या महानायकाला अखेरचा निरोप दिला.. बाळासाहेब ठाकरे नावाच्या महानायकाने मराठी मनांवर कोरलेले एक जिवंत पर्व संपल्याच्या उदास भावनेने शिवतीर्थाचे विशाल मैदानही खिन्न झाले..
सकाळी साडेनऊच्या सुमारास वांद्रय़ाच्या मातोश्री निवासस्थानावरून निघालेली बाळासाहेब ठाकरे यांच्या अंतिम प्रवासाची विराट महायात्रा दुपारी दादरच्या शिवसेनाभवनाजवळ पोहोचली, तेव्हा तेथेही लाखो चाहत्यांचा महासागर लोटलाच होता. गेल्या पंचेचाळीस वर्षांत कधीही न रडलेला आणि पराजयासमोरही ताठ मानेने उभा राहणारा शिवसैनिक आज मात्र मातोश्री ते शिवतीर्थ या जेमतेम साडेचार-पाच किलोमीटर मार्गावरून चालताना अश्रू ढाळत होता.. शिवतीर्थावर जाताना आणि तेथून परतताना बाळासाहेबांच्या ज्वलंत शब्दांची शिदोरी घेऊन नवा आत्मविश्वास मनामध्ये रुजविण्याचा आजवरचा शिरस्ता आज मोडल्याच्या भावनेने खंतावला होता. आपल्या  दैवताचे दर्शन घेण्याच्या ओढीने आजवर असंख्य वेळा शिवसैनिकांनी शिवतीर्थावर धाव घेतली.. बाळासाहेबांचे आगमन होताच, ‘क्षत्रिय कुलावतंस..’ च्या घोषणांनी दादरचा परिसर दणाणून सोडणारा, ‘आवाज कुणाचा’ अशा आव्हानात्मक घोषणा देताना श्वास रोधून धरणारा आणि ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधूभगिनींनो’. हे शब्द ऐकण्यासाठी कानांत जीव साठवणारा शिवसैनिक आज लाखोंच्या संख्यने शिवतीर्थावर सुन्न मनाने दाखल झाला आणि जडपणे घरी परतला..
संध्याकाळी पाचच्या सुमारास बाळासाहेबांचे पार्थिव सेना भवनकडून शिवाजी पार्क मैदानावर निर्माण करण्यात आलेल्या दहनभूमीवर आणण्यात आले, आणि शिवाजी पार्कचा परिसर घोषणांनी दणाणून गेला. मात्र या घोषणांमध्ये जोश नव्हता. केवळ करुणा होती.. ‘बाळासाहेब परत या’, असा टाहो होता.. राजकीय नेते, उद्योग, कला, क्रीडा क्षेत्रातील असंख्य नामवंत, कुटुंबीय आणि चाहत्यांनी बाळासाहेबांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर अंत्यसंस्कारविधी सुरू झाले आणि गर्दीच्या महासागरात बेचैनीच्या लाटा उसळू लागल्या. उद्धव ठाकरे, जयदेव ठाकरे, राज ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. धार्मिक मंत्रोच्चारांचा गजर सुरू झाला, रामरक्षेचे गंभीर सूर उमटू लागले आणि पुन्हा मैदान स्तब्ध झाले..
लाखोंचा समुदाय शांतपणे प्रार्थनेत सहभागी झाला आणि शिवाजी पार्क मैदानाने बाळासाहेबांच्या उपस्थितीत प्रथमच एका शोकाकुल आणि गंभीर वातावरणाचा अनुभव घेतला.. बाळासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला, तेव्हा अनेकांना अश्रू अनावर झाले होते. काळोख दाटू लागला. शिवतीर्थावर धगधगणाऱ्या ज्वाळा पाहून रविवारी मात्र शिवसैनिक व्याकूळ झाला होता..

Story img Loader