शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क परिसरातच उभारण्यात येणार आहे. मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या स्मारकाच्या जागेचा शोध घेतला असून महापौर बंगल्याच्या परिसरातील दोन जागा निश्चित केल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परदेशातून परतल्यानंतर मुख्यमंत्री आणि ठाकरे यांच्या बैठकीनंतर याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचा जन्म दादरमध्ये झाला. एवढेच नव्हे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक सभाही याच शिवाजी पार्कमध्ये गाजल्या. शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजीपार्क यांचे अतूट नाते असल्याने ठाकरे यांचे स्मारक याच भागात व्हावे अशी मागणी शिवसेनेकडून केली जात होती. त्यामुळे ठाकरे यांच्या स्मारकासाठी योग्य जागा शोधण्यासाठी सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने वडाळा, चेंबूर, शिवाजी पार्कसह सहा ठिकाणी जागांची पाहणी केली. त्यातून महापौरांच्या बंगल्या शेजारील आणि त्याच्यात काही अंतरावर असलेली क्रीडा संकुलाची जागा निश्चित करण्यात आली आहे. ही जागा महापालिकेच्या मालकीची असून, शिवाय मोठीही असल्याने तेथेच बाळासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्याचे समितीने प्रस्तावित केल्याचे सूत्रांनी सांगितले. समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला असून त्यावर ठाकरे यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील असे सांगितले जात आहे.

 

Story img Loader