बाळासाहेबांचे निवासस्थान असलेला मातोश्री बंगला म्हणजे शिवसैनिकांचे चैतन्यस्थळ! राज्यातील आणि राज्याबाहेरील असंख्य शिवसैनिकांनी अनेकदा बाळासाहेबांच्या भेटीच्या ओढीने आणि त्यांच्याशी दोन शब्द तरी बोलण्याची संधी मिळावी या अपेक्षेने मातोश्रीला भेटी दिल्या आणि चैतन्य पदरी बांधूनच ते माघारी गेले.. आज मात्र, मातोश्रीचे ते चैतन्य हरपले होते. बाळासाहेबांवर मातोश्रीच्या दुसऱ्या मजल्यावरील दालनात उपचार सुरू असताना त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी येणाऱ्या कोणासही तेथे जाण्यास परवानगी नव्हती. शनिवारी दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांनी बाळासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला आणि शिवसैनिकांचे हे चैतन्यस्थळ सुन्न झाले.. मातोश्रीच्या दुसऱ्या मजल्यावर बाळासाहेबांचे पार्थिव एका काचेच्या पेटीत ठेवण्यात आले होते. त्यांच्या शरीरावर भगवी वस्त्रे होती, आणि शिवसैनिकांसाठी बाळासाहेबांइतक्याच आदरस्थानी असलेल्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांची लहानशी प्रतिमा बाळासाहेबांच्या पार्थिवावर छातीशी ठेवण्यात आली होती.. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याची संधी आज काही मोजक्याच निकटवर्तीयांना मिळाली.. पण अशा अवस्थेतील हा शिवसेनेचा ढाण्या वाघ पाहून त्यांना गलबलून येत होते.    

Story img Loader