बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरून त्यांच्या मुलांमध्ये सुरू असलेल्या कायदेशीर वादात ठाकरे कुटुंबियांच्या डॉक्टरांनी बुधवारी मुंबई न्यायालयात साक्ष नोंदविली. बाळासाहेबांनी मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली त्यावेळेस त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती, असे म्हणणे चुकीचे ठरेल. ते आजारी होते परंतु, त्यांची मानसिक स्थिती चांगली होती, असे डॉक्टरांनी न्यायालयात म्हटले. तसेच ते दिवसातून दोन वेळा वाईन देखील घेत होते, असा खुलासा देखील डॉक्टरांनी यावेळी केला.
बाळासाहेबांनी मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली, त्यावेळी त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती, असा दावा जयदेव ठाकरे यांनी केला. हा दावा ठाकरे कुटुंबियांच्या डॉक्टरांनी न्यायालयात फेटाळून लावला. न्यायाधीश गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे सुरू असलेल्या या खटल्यात साक्षीदार म्हणून उपस्थित असलेल्या ठाकरे कुटुंबियांच्या डॉक्टरांना बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत प्रश्न विचारण्यात आले. बाळासाहेबांनी मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली त्यावेळेस त्यांची मानसिक स्थिती आणि स्मरणशक्ती चांगली नव्हती, हे खरं आहे का?, असा प्रश्न जयदेव ठाकरेंच्या वकिलाने डॉक्टरांना विचारला. यावर डॉक्टरांनी नाही, हे खरे नाही, मी याच्याशी अजिबात सहमत नसल्याचे म्हटले. तसेच बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत संपूर्ण ठाकरे परिवार वेळोवेळी चौकशी करत असल्याचेही डॉक्टर म्हणाले.
बाळासाहेबांच्या वाईन घेण्याच्या सवयीबद्दल डॉक्टरांना विचारण्यात आले असता बाळासाहेब दिवसातून दोनवेळा दीड ग्लास वाईन घेत होते, असा खुलासा डॉक्टरांनी केला. तसेच ते अशक्तपणा आणि दीर्घकालीन आजाराचा सामना करत होते, असेही डॉक्टर पुढे म्हणाले. कार्यक्रम आणि सभांवेळी तुम्ही त्यांच्यासोबत का उपस्थित राहत होतात? या प्रश्नाच्या उत्तरात तशी बाळासाहेबांचीच इच्छा होती असे उत्तर डॉक्टरांनी न्यायालयात दिले. मात्र, न्यायालयाने डॉक्टरांना वैद्यकीय स्वरूपात उत्तर देण्यास सांगितले. त्यांना कोणत्याही क्षणी वैद्यकीय उपचारांची आवश्यकता भासू शकत होती म्हणून आपण बाळासाहेबांसोबत राहात होतो, असे डॉक्टर म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्यात संपत्ती वाटपावरून न्यायालयीन लढाई सुरू आहे. १३ डिसेंबर २०११ रोजी तयार करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या अंतिम मृत्यूपत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा वाटा देण्यात आला आहे. त्या तुलनेत जयदेव यांना फार कमी वाटा मिळाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा