रेसकोर्स आणि शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे उभारण्यात येणाऱ्या स्मृती उद्यानाबाबत राजकारण करू नका, असे कळकळीचे आवाहन करणारी शिवसेना नरेपार्कवर मीनाताई ठाकरे व बाळासाहेबांच्या नावे होणाऱ्या विकासकामांना विरोध करण्याचा दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप मनसेचे गटनेते आमदार बाळा नांदगावकर यांनी गुरुवारी केला. बीआयटी चाळ येथील बाळासाहेब ठाकरे यांनीच उद्घाटन केलेल्या अभ्यासिकेच्या जागेवर २५ मजली टॉवर उभा राहिला तेव्हा सेनेचे नेते गप्प का राहिले, असा सवालही त्यांनी केला. शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांच्या माध्यमातून क्रीडा संकुल, तरणतलाव, योग केंद्र, आरोग्य केंद्र, विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका, ज्येष्ठांसाठी ग्रंथालयापासून विविध उपक्रम राबविण्यात येणार असून येत्या रविवारी दसऱ्याला राज ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. नरेपार्कसह अन्यत्र उभारण्यात येणाऱ्या या कामांमुळे हादरलेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी ‘नरेपार्क बचाव’चा नारा देत जोरदार आंदोलन उभारून नांदगावकर यांच्या योजनांना विरोध केला. महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता असून नरेपार्कवर केवळ १० टक्केजागेतच पालिकेच्या नियमानुसार स्थानिक लोकांच्या मागणीनुसार क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेचे आमदार विठ्ठल चव्हाण यांनी बांधलेल्या व बाळासाहेबांनी उद्घाटन केलेल्या अभ्यासिकेच्या जागी बिल्डरांचा टॉवर कसा उभा राहिला तसेच नरेपार्क येथे एक कोटी रुपये खर्चून नागरी सुविधांसाठी उद्घाटन करण्यात आले. प्रत्यक्षात २००९ पासून आजपर्यंत एक पैशाचेही काम झाले नसून एक कोटी रुपये कुठे गेले, असा सवाल नांदगावकर यांनी केला. शिवसेनेच्या नेत्यांना बाळासाहेबांच्या नावे एकही गोष्ट धड का करता आली नाही, याची माहिती सेनेच्या पक्षनेतृत्वाने घ्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनाप्रमुखांचे नाव आणि राज ठाकरे यांच्या हस्ते होणारे उद्घाटन यामुळे धडकी भरलेल्या स्थानिक सेना नेत्यांनी नरेपार्कवरील क्रीडा संकुलाला विरोध केला असून रेसकोर्सच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी केलेले आवाहन तरी मला विरोध करताना आठवायला हवे होते, असा टोला बाळा नांदगावकर यांनी लगावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा