गुढी पाडव्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. महाराष्ट्रातलं राजकारण, गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी या सगळ्या विषयांवर राज ठाकरे काय बोलताना याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या सभेपूर्वी मनसेचे नेते बाळानांदगावर यांनी टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आज होणाऱ्या सभेबाबत भाष्य केलं. तसेच दादरमध्ये राज ठाकरे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लावण्यात आले आहेत, याबाबत ही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – गलिच्छ राजकारण, तुरटी आणि अणुबॉम्ब..कसं असेल राज ठाकरेंचं आजचं भाषण; संदीप देशपांडे म्हणतात…!
काय म्हणाले बाळा नांदगावकर?
महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर आजपर्यंत केवळ युतीची सरकारं आली आहेत. मात्र, २००६ मध्ये मनसेची स्थापना झाल्यापासून आम्ही ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली. आम्ही इतर लोकांनाही मदत केली. मात्र, त्यामागे कोणताही स्वार्थ नव्हता. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे जे विचार देतील. ते राज्याच्या आणि पक्षाच्या दृष्टीने हिताचे असणार आहेत. आजची सभा महत्त्वाची असणार आहे, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावरकर यांनी दिली.
राज्यात आज ज्याप्रकारे राजकारण सुरू आहे, त्याला जनता आता कंटाळली आहे. या राजकारणाचा त्यांना वीट आला आहे. त्यामुळे जनतेला आता बदल हवा आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे ठाकरेंच्या सभेपूर्वी दादरमध्ये भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लावण्यात आले आहेत. याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंच्या सभेसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. ती प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे. मुळात राज ठाकरे जर मुख्यमंत्री झाले, तर कोणाला आवडणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट बघतो आहे. कारण आम्हाला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी माझ्यासारखे शिलेदार, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे ते म्हणाले.