शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) बाळासाहेबांचे स्मारक व्हावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पण खेळासाठी राखीव असलेल्या शिवाजी पार्कवर खेळणाऱ्यांची पावले थांबवून आपले स्मारक उभारणे खुद्द क्रीडाप्रेमी बाळासाहेबांनाही आवडले नसते, असा सूर क्रीडाप्रेमी आणि क्रीडा प्रशासकांमध्ये उमटत आहे.
‘‘शिवसेनाप्रमुख हे सच्चे क्रीडाप्रेमी होते. त्यामुळे राबत्या मैदानावर खेळणारी पावले थांबवून, खेळाचा श्वास कोंडून तिथे आपले स्मारक उभारणे, हे बाळासाहेबांनाही पटले नसते. युवा पिढीने बाळासाहेबांसारख्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाकडून प्रेरित व्हावे, यासाठी बाळासाहेबांच्या स्मृती जागवायलाच हव्यात. शिवाजी पार्कचे एकूण आकारमानच घटत चालले आहे. भविष्यात सभोवताली सर्व स्मारके उभारली गेली तर शिवाजी पार्क हे एक मंदिरच होईल. म्हणूनच त्यांच्या स्मारकासाठी अन्य पर्यायांचा विचार व्हायला हवा,’’ असे मत मैदान बचाव समितीचे अध्यक्ष भास्कर सावंत यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस मोहन भावसार यांनीही अशाच प्रकारचे मत मांडले आहे. खेळाच्या मैदानावर आपलं स्मारक बाळासाहेबांनीच होऊ दिलं नसतं, असं भावसार म्हणतात.
‘‘महाराष्ट्राच्या निर्माणात बाळासाहेबांचे योगदान फारच मोठे आहे. ४० वर्षांहून अधिक काळ ज्यांनी शिवाजी पार्कवर सभा गाजवल्या, त्या शिवतीर्थाशी अतूट नाते असलेल्या बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कवर व्हावे, यात वावगे काहीच नाही. पण खेळ आणि खेळाडूंवर परिणाम होऊ नये, अशा प्रकारे बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यात कुणाचीही हरकत नसावी,’’ असे मुंबई खो-खो संघटनेचे सचिव आणि समर्थ व्यायाम मंदिराचे खो-खो प्रमुख अरुण देशमुख यांनी सांगितले.
दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत जात आहे, तसतशी खेळणाऱ्या मुलांची संख्याही वाढत जाणार आहे. मात्र खेळाची मैदाने कमी होत चालली आहेत. त्यामुळे आहे ती जागा कमी न करता कशा प्रकारे स्मारक बांधले जाऊ शकते, याचा विचार करण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेच्या स्थापनेचं बीज रोवलं गेलं.. ४० वर्षे अथक परिश्रम घेऊन त्यांनी जे वाढवलं, फोफावलं, त्या ठिकाणी बाळासाहेबांचे स्मारक होणे हे उचित आहे. ज्या माणसाने असामान्य कर्तृत्व दाखवले, त्यांची कीर्ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे स्मृतिस्तंभ किंवा स्मारके अत्यावश्यक आहेत. पण मैदानाला आणि खेळाला हानी न पोहोचवता त्यांचे स्मारकही होईल आणि त्यांच्या स्मृतीही कायम राहतील, असे स्मारक उभे राहिले तर ती चांगलीच गोष्ट आहे, असे समर्थ व्यायाम मंदिराचे कार्यवाह आणि भारतीय मल्लखांब फेडरेशनचे माजी सचिव उदय देशपांडे यांनी सांगितले.    

Story img Loader