अलीकडेच महाराष्ट्र नगररचना कायद्यात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बदल करण्यात आले असून, त्यानुसार मैदानात बांधकाम करता येणार नाही. परिणामी कायद्याचे उल्लंघन करून शिवाजी पार्कमध्ये स्मारक बांधता येणार नाही, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्कवर स्मारक उभारण्याच्या शिवसेनेच्या संकल्पाला धक्का दिला. त्यामुळे आजवर मुख्यमंत्र्यांची पाठराखण करणारी शिवसेना आता कोणती भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेची स्थापना केली. गेली ४२ वर्षे दसरा मेळव्याच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुखांनी लाखो लोकांची मने जिंकली. याच शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. शिवसेनाप्रमुख आणि शिवाजी पार्कचे अतूट नाते लक्षात घेऊन तेथेच त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. मात्र शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान असल्याने, तसेच हा परिसर शांतताक्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्यामुळे तेथे कार्यक्रम आयोजित करण्यास उच्च न्यायालयाने यापूर्वीच मज्जाव केला आहे. शिवाजी पार्क हे मनोरंजन मैदान असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला असून, सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. मात्र राज्य सरकारने त्यावर कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी प्रथमच या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र नगररचना कायद्यानुसार (एमआरटीपी) शहरातील मोकळ्या जागा, मैदान तसेच पाणथळ क्षेत्रात बांधकाम करण्यास परवानगी देता येत नाही. त्यामुळे शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारता येणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. अर्थात स्मारकाबाबतचा कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना आता कोणती भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.    

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ नोव्हेंबरला ‘बाळासाहेबांचे शिवाजी पार्कवर भव्य स्मारक व्हावे,’ ही ‘अपेक्षित’ मागणी खासदार मनोहर जोशी यांनी केली. त्यानंतर या मागणीवर बरीच मतमतांतरे झाली, वादही झडले. या मागणीनंतरचा घटनाक्रम.
१९ नोव्हेंबर- शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यासाठी शिवसेनेचा राज्य सरकारला प्रस्ताव.
१९ नोव्हेंबर- नगरविकास राज्यमंत्री व पूर्वाश्रमीचे शिवसैनिक भास्कर जाधव यांच्याकडून या मागणीला पाठिंबा.
२० नोव्हेंबर- स्मारकावरून निर्माण झालेला वाद थांबवा, संयम राखण्यात आम्हाला सहकार्य करा- उद्धव ठाकरे.
२० नोव्हेंबर- आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा शिवसेनेच्या स्मारकाबाबतच्या मागणीला पाठिंबा.
२२ नोव्हेंबर- मुंबई पालिकेच्या विशेष सभेत या मागणीचा शिवसेना नगरसेवकांकडून पुनरुच्चार. मात्र बाळासाहेबांचे स्मारक इंदू मिलच्या निम्म्या जागेत उभारले जावे, अशी मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे आणि काँग्रेसचे नगरसेवक सुनील मोरे यांची खळबळजनक सूचना.
२३ नोव्हेंबर- मुंबईत कोणाचीच स्मारके नकोत, लोकोपयोगी प्रकल्पांना महापुरुषांची नावे द्या, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आव्हानात्मक भूमिका.

Story img Loader