शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधी स्थळावरून रंगलेल्या वादावर आज शिवसेना कार्याध्यक्ष यांनी पहिल्यांदाच आपले मौन सोडले. शिवसैनिक हीच बाळासाहेबांची शक्ती होती आणि आजही आहे. त्यामुळे आजही अनेक शिवसैनिक येथे खडा पहारा देत आहेत. हेच शिवसैनिक स्वत:च्या हाताने शिवसेनाप्रमुखांचे समाधी स्थळ थोडे बाजूला सरकवतील, अशी भूमिका शिवसेने मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकातून उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कवरच राहिल असा संदेश यातून देण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी शिवेसनेच्या नेत्यांनी  मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेचा तपशिल घेऊन काल (बुधवार) महापौर सुनिल प्रभू आणि सुभाष देसाई यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर उध्दव ठाकरेंनी वादंग टाळण्यासाठी ही सामजस्याची भूमिका घेतल्याचे ‘सामना’मध्ये म्हटले आहे.
‘शिवसेनाप्रमुखांना जाऊन महिना होत असला तरी त्यांचे अस्तित्व आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. जे कधीच घडणार नाही असे वाटत होते ते घडले आहे व आजही शिवसेनाप्रमुखांच्या आठवणीने महाराष्ट्र व्याकुळ आहे. महाराष्ट्रात इतकी शोक-लहर कधीच उठली नव्हती’, असंही उध्दव ठाकरे पुढे म्हणाले आहेत.
दरम्यान, अंत्यसंस्काराच्या जागेऐवजी त्याच्या लगत छोटे उद्यान तयार करणे, महापौर बंगल्यामध्ये अथवा शिवाजी पार्क तरणतलावालगत स्मारक करणे आदी पर्यायांवर विचार सुरु असून अंत्यसंस्काराची जागा मोकळी करून देईपर्यंत सरकारकडून कोणतेही सहकार्य मिळणार नाही, हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा