शिवसेनेला पहिली सत्ता मिळवून देणाऱ्या ठाणे शहरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडणारे समग्र असे वस्तुसंग्रहालय तसेच स्मारक उभारण्याचा एकमुखी निर्णय सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या वस्तुसंग्रहालयात बाळासाहेबांनी रेखाटलेली व्यंगचित्रे तसेच त्यांची गाजलेली भाषणे, छायाचित्रे, अग्रलेखांचा खजिना जपून ठेवता यावा, यासाठी स्वतंत्र दालन उभारण्याचा ठरावही करण्यात आला. याशिवाय महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलावाच्या मध्यभागी शिवसेनाप्रमुखांचा १२ फुटी पुतळा उभारण्याचा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला.
बाळासाहेबांच्या निधनाबद्दल ठाणे महापालिकेतील सर्वसाधरण सभेत मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावावर चर्चा करत असताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठाणे शहरात त्यांच्या स्मृती जपल्या जाव्यात यासाठी काही महत्त्वाचे ठराव मंजूर केले. या वेळी महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्यासह शिवसेनेच्या बहुतांश नगरसेवक, नगरसेविकांना शिवसेनाप्रमुखांविषयी आठवणी जागविताना भावना अनावर झाल्या.  या वेळी कोलशेत येथील नियोजित क्रीडा संकुलास शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याचा निर्णयही घेण्यात आला. ठाणे आणि शिवसेनाप्रमुखांचे एक वेगळे नाते होते. शिवसेनेला पहिली सत्ताही ठाण्याने मिळवून दिली. बाळासाहेबांच्या आग्रहामुळेच ठाणेकरांना पहिले नाटय़गृह मिळाले. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती जपल्या जाव्यात यासाठी ठाण्यात त्यांचे स्मारक उभारण्याचा ठराव सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मांडला. हे स्मारक उभे करताना बाळासाहेबांचा जीवनपट उलगडणारे वस्तुसंग्रहालयही उभारले जावे, असेही ठरविण्यात आले. दरम्यान, महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलावात शिवसेनाप्रमुखांचा १२ फुटी पुतळा उभारण्याचा ठरावही या वेळी मंजूर करण्यात आला. कोलशेत येथे महापालिकेच्या माध्यमातून क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा प्रस्ताव आहे. सध्या तरी महापालिकेच्या मंजूर विकास आराखडय़ात ही जागा पार्कसाठी आरक्षित असून त्यापैकी ९० टक्के जागा महापालिकेच्या मालकीची आहे. या आरक्षणात बदलाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून त्या ठिकाणी क्रीडा विद्यापीठाचे आरक्षण लागू करावे, असा ठरावही या वेळी मंजूर करण्यात आला. या क्रीडा विद्यापीठास सचिन तेंडुलकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी सुरुवातीला जोर धरत होती. मात्र, सोमवारी सर्वसाधारण सभेत या नियोजित क्रीडा विद्यापीठास शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याचा ठरावही एकमुखाने मंजूर करण्यात आला.
मुंब्रा येथील स्टेडियमला बाळासाहेबांचे नाव ?
मुंब्रा-कौसा भागात महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या स्टेडियमला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याची वादग्रस्त सूचना भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी या वेळी केली. मुस्लीमबहुल विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंब्रा-कौसा भागातील स्टेडियमला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याच्या सूचनेविषयी या भागातील नगरसेवकांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. दरम्यान, ही फक्त सूचना होती. अंतिम मंजूर ठरावांमध्ये स्टेडियमला बाळासाहेबांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आलेला नाही, अशी माहिती सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी दिली.     

Story img Loader