ज्या शिवाजी पार्कवर शिवसेनेचा जन्म झाला, जेथे लाखोंच्या उपस्थितीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेबांच्या स्मृती उद्यानाचे भूमिपूजन बुधवारी दुपारी अवघ्या ३० जणांच्या उपस्थितीत गुपचूप उरकण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख परदेशात तर शिवसेना नेते मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, सेनेचे गटनेते आ. सुभाष देसाई यांच्यासह सेनेचे प्रमुख नेते मुंबईत असतानाही कोणालाही कल्पना न देता परस्पर भूमिपूजन उरकण्यात आल्यामुळे मनोहर जोशी यांच्यासह सारेच जण कमालीचे संतप्त झाले आहेत.
शिवसेनाप्रमुखांच्या अंत्यसंस्कारानंतर लगेचच मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावी, अशी मागणी केली. खा. संजय राऊत यांनी सातत्याने त्यासाठी आवाज उठवला. परिणामी जवळपास दीड महिना अंत्यसंस्काराची जाग शिवसेनेने रिकामी करून पालिकेला दिली नव्हती. त्यानंतर शिवाजी पार्कवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारची जागा बाळासाहेबांच्या स्मृती उद्यानासाठी देण्याचा ठराव सेनेने पालिकेत मंजूर करून घेतला. त्यावर निर्णय घेण्यास आयुक्त सीताराम कुंटे यांनी दीड महिना वेळ घेतला. त्यानंतर केवळ २० फूट बाय ४० फूट जागेवर कोणतेही बांधकाम न करता केवळ हिरवळीचे स्मृती उद्यान करण्यास परवानगी देण्यात आली.
परवानगी मिळाल्यानंतर आज सकाळी महापौर सुनील प्रभू यांच्या बंगल्यामधून सेना नेते दिवाकर रावते यांना महापौर बंगल्यावर येण्यासाठी फोन करण्यात आला. त्यानुसार ते तेथे आल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृती उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन करण्यास त्यांना सांगण्यात आले. दुपारी एकच्या सुमारास दिवाकर रावते, महापौर सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, सभागृहनेते शैलेश फणसे आणि पालिका अधिकारी व काही शिवसैनिक अशा सुमारे तीस एक लोकांच्या उपस्थितीत रावते यांनी कुदळ मारून भूमिपूजन केले आणि रावते, प्रभू, शेवाळे, फणसे व पालिका अधिकाऱ्यांनी चार नारळ वाढविले. उद्धव यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या एकाही नेत्याला अथवा विभागप्रमुख असलेल्या सदा सरवणकर यांच्यासह दादरमधील एकाही सेनेच्या पदाधिकाऱ्याला बोलाविण्यात आले नाही. यानंतर संतप्त झालेल्या मनोहर जोशी यांनी महापौर सुनील प्रभू यांना दूरध्वनी करून खडसाविल्याचे समजते. जोशी यांना जलना येथील सभेसाठीही आमंत्रित करण्यात आले नव्हते. मात्र संजय राऊत यांनाही का दूर ठेवण्यात आले याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येते. याबाबत महापौरापासून उपस्थितांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Story img Loader