मुंबई : राज्यातील गोरगरीब रुग्णांना सर्दी, खोकला व ताप आदी छोट्या आजारांसाठी बाह्यरुग्णसेवा मोफत उपलब्ध व्हावी या संकल्पनेतून आरोग्य विभागाने सुरु केलेल्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात गेल्या वर्षभरात ४२ लाख ४० हजार ७८० लोकांना बाह्यरुग्णसेवा देण्यात आली तर सुमारे पाच लाख रुग्णांची मोफत प्रयोगशाळा चाचणी आणि ६८ हजार ३७२ गर्भवती महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मात्र लाखो गोरगरीब रुग्णांसाठी हितकारी ठरलेल्या या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला राज्य शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. परिणामी ७०० मंजूर दवाखान्यांपैकी डिसेंबर २०२४ पर्यंत केवळ ४२८ दवाखाने सुरु होऊ शकले आहेत. निधीच्या उपलब्धतेअभावी २७२ दवाखान्यांचे भवितव्य अधांतरी आहे.
तत्कालीन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना मांडण्यात आली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर या योजनेला वेग देताना मुंबईत मोठ्या प्रमाणात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात आले तर ग्रामीण भागासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून ७०० दवाखाने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली होती. यापैकी ४२८ दवाखाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरु करण्यात आले असून यात १ मे २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधित तब्बल ४२ लाख ४० हजार ७८० लोकांची बाह्यरुग्ण तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. याशिवाय आवश्यकतेनुसार चार लाख ९७ हजार लोकांची प्रयोगशाळा चाचणी करण्यात आली.
शहरी भागात झोपडपट्टी तसेच ग्रामीण भागात फॅमीली डॉक्टर ही संकल्पना जवळपास संपुष्टात आली आहे. अशावेळी सर्दी, तापआदी छोट्या आजारांसाठी डॉक्टर मिळणे कठीण होत असल्याचे लक्षात घेऊन तत्कालीन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना असावा अशी भूमिका घेत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना मांडली. या योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर आरोग्य विभागाच्या माध्यमातून ४२८ दवाखाने सुरु करण्यात आले. एकूण ७०० दवाखान्यांपैकी उर्वरित २७२ दवाखाने अजूनही कागदावरच आहेत. त्यापैकी ४४ दवाखाने हे आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरु केले जातील तर २२८ दवाखाने हे बाह्यस्त्रोत यंत्रणेच्या माध्यमातून चालवले जातील, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यासाठी २०२४-२५ साठी ३७८ कोटी रुपयांच्या खर्चाला शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. या दवाखान्यांमध्ये एक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सहाय्यक तसेच शिपाई असे मनुष्यबळ देण्यात आले आहे. प्रत्यक्षात आजपर्यंत १०० कोटी ४५ लाख रुपयेच खर्च करण्यात आले असून आरोग्य विभागाने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ७०० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानासाठी मनुष्यबळ व अन्य खर्चासाठी ३७८ कोटी दोन लाख रुपयांची मागणी केली आहे.
शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागापासुन तसेच झोपडपट्टी वस्ती पासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर जास्त असणे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कामकाजाच्या अयोग्य वेळेमुळे, काही झोपडपट्ट्या व झोपडपट्टी सदृश भाग आरोग्य सेवांपासून वंचित राहत आहेत. यास्तव विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी, ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ च्या माध्यमातून गरजू रुग्णांना सेवा देण्यासाठी राज्यशासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे. त्या अनुषंगाने राज्यामध्ये ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ स्थापन करण्यास शासनाने ११ जुलै, २०२३ या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता पाच वर्षासाठी देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत एकूण ४२८ ठिकाणी मे २०२३ पासून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना टप्याटप्याने कार्यान्वित करण्यात आले आहेत. यासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर करण्यात आला असून हा वापरलेला निधीही पूर्णता अद्यापि आरोग्य विभागाने परत केलेला नाही. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार ४२८ दवाखाने सुरु झाले असले तरी यातील अनेक दवाखाने वेगवेगळ्या कारणांमुळे प्रत्यक्षात सुरु झाले नसून सध्या ४०८ दवाखाने कार्यरत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजनेकरिता ३७८ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामधील १०० कोटी निधी सन २०२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व २७८ कोटी २०२४ च्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आले. सदर मंजूर १०० कोटींपैकी ३० कोटी निधी शासनाकडून नोव्हेंबर २०२४ मध्ये प्राप्त झाला तर ७० कोटी निधी शासनाकडून जानेवारी २०२४ मध्ये प्राप्त झला आहे. आपला दवाखाना टप्याटप्याने कार्यान्वित होत असल्यामुळे २ ऑक्टोबर २०२४ मध्ये १७८ कोटी निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आलेली आहे. त्यापैकी ६१ कोटी ७१ लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास राज्य शासनाकडून १७ जानेवारी २०२५ मान्यता मिळाली आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात शासनाकडून एकूण १६१ कोटी ७१ लाख रुपये इतका निधी आपला दवाखाना कार्यक्रमासाठी राज्य आरोग्य सोसायटी या कार्यालयास वितरीत करण्यात आलेला आहे. शासनाकडून आरोग्य विभागाला पुरेसा निधी उपलब्ध करून न देण्यात आल्यामुळे २०२३-२४ या आर्थिक वर्षात . ६० कोटी २७ लाख रुपये व २०२४-२५ या आर्थिक वर्षात २१ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ४० कोटी १९ लाख रुपये असे एकूण १०० कोटी ४५ लाख रुपये इतका खर्च २१ फेब्रुवारी २०२५ पर्यंत झाल्याचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. यामुळेच २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागाने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यासाठी ३७८ कोटी दोन लाख रुपयांची मागणी केली आहे. आरोग्य विभागाला हा निधी प्राप्त न झाल्यास उर्वरित २७२ दवाखाने सुरु करता येणार नाही, असेही आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. याबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांना विचारले असता, हजारो गोरगरीबांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे.
आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून तयार झालेली ही योजना पूर्ण ताकदीने राबविणे ही माझी जबाबदारी आहे. या योजनेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही तसेच लवकरात लवकर उर्वरित २७२ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केले जातील. तस पाहिले तर आरोग्य विभागाला कायमच पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात नाही. तसेच आवश्यक निधीही वेळेत मिळत नाही, हे लक्षात घेऊन मी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे आरोग्य विषयक योजनांना पुरेसा निधी मिळेल यासाठी पाठपुरवा करेन. आगामी काळात ७०० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पूर्ण क्षमतेने सुरु झालेले असतील असा विश्वासही आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी व्यक्त केला.