मुंबई : सर्वसामान्यांना खासगी संस्थेमध्ये रक्त तपासणीसह विविध चाचण्या करण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांसह आरोग्य केंद्रांमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्सा योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा रुग्णांना मोठा फायदा होत होता. मात्र या योजनेअंतर्गत रुग्णांच्या विविध चाचण्या करणाऱ्या क्रस्ना डायग्नोस्टीक सेंटरची गेल्या १० महिन्यांमध्ये १० कोटी रुपयांहून अधिक रक्कम महानगरपालिकेने थकविली आहे. थकीत रक्कम मिळावी यासाठी या कंपनीने महापालिकेच्या मध्यवर्थी खरेदी खात्याला अखेरचे स्मरणपत्र पाठवून ही सेवा नाईलाजास्तव बंद करावी लागेल, असे कळविले आहे. त्यामुळे लवकरच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्सा योजना बंद पडण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना नाममात्र दरामध्ये चाचण्यांची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्सा योजना सुरू केली. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून क्रस्ना डायग्नोस्टीक सेंटरची नियुक्ती करण्यात आली. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमधील मुंबई महापालिकेची रुग्णालये, दवाखाने, प्रसुतीगृह आदी ठिकाणी ही योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार मुलभूत चाचण्यांसाठी प्रति रक्त नमुना ८६ रुपये व विशेष चाचण्यांसाठी प्रति रक्त नमुना ३४४ रुपये दर आकारण्यात येत आहे. या योजनेसाठी महानगरपालिकेने सुमारे २७ कोटी ५२ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली. मागील १० महिन्यांपासून या कंपनीने केलेल्या विविध चाचण्यांच्या शुल्काचे देयक महानगरपालिकेने न दिल्याने कंपनीला ही सुविधा पुढे सुरू ठेवण्यात अडचणी येत आहेत.

हेही वाचा – मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांची क्षमा मागणार, विलेपार्ल्यातील मराठी रहिवाशांचे अनोखे आंदोलन

गेल्या १० महिन्यांमध्ये कंपनीचे १० कोटी तीन लाख रुपये थकले आहे. त्यामुळे ही सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन देणेही कंपनीला शक्य झालेले नाही. देयकाची थकीत रक्कम द्यावी अशी विनंती कंपनीने ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये महापालिकेकडे केली होती. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर ११ डिसेंबर २०२३ रोजी या कंपनीने अखेरचे स्मरणपत्र पाठवून किमान ८० टक्के रक्कम देण्याची विनंती केली आहे. तसेच प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यास ही सेवा बंद करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसेल, असेही या पत्रात नमुद केल्याचे समजते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू केलेली योजना देयकाची रक्कम थकविल्यामुळे बंद करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवण्याची शक्यता आहे.

क्रस्ना कंपनीचे पत्र आम्हाला मिळाले असून आरोग्य विभागाच्या अडचणी आणि क्रस्ना कंपनीच्या अडचणी जाणून घेण्यात येतील. तसेच कंपनीने निविदा प्रक्रियेमध्ये ठरलेल्या नियमांनुसार सुविधा दिली आहे की नाही हे तपासण्यात येईल. सुरुवातीच्या काळात कंपनीकडून काही चाचण्यांचे अहवाल सहा किंवा आठ तासांमध्ये येणे अपेक्षित असताना ते चार दिवसांनी येत होते. त्यामुळे कंपनी देत असलेल्या सुविधेची माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल. ही योजना कायम ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. – विजय बालमवार, उपायुक्त, मध्यवर्ती खरेदी खाते, मुंबई महानगरपालिका

हेही वाचा – साप आणि अजगरांची तस्करी करणाऱ्याला अटक; नऊ अजगर व दोन सापांची सुटका – डीआरआयची कारवाई 

कोणत्या तपासण्या होतात ?

मधुमेह, थायरॉईड, डेंग्यू, लेप्टो, हिवताप, प्रोटीन, व्हिटामिन डी ३, एससीवीसी रॅपीड, चिकनगुनिया, व्हिटामिन बी १२, ब्लड कल्चर, यकृत, लघवी, बॅक्टेरिया कल्चर, एचआयव्ही, क्रेटीनाईन, बायोप्सी आदी १३९ चाचण्या करण्यात येतात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray aapli chikitsa yojna is on the verge of closure mumbai print news ssb