वसेनाप्रमुखांच्या चित्रपटसृष्टीशी फार पूर्वीपासून संबंध! गुरुदत्त फिल्मच्या ‘मिस्टर अॅण्ड मिसेस ५५’ या चित्रपटात गुरुदत्त व्यंगचित्रकार- अर्कचित्रकार आहे. तेव्हा क्लोजअपमध्ये दाखविलेला हात शिवसेनाप्रमुखांचा आहे. त्यांचे रेखाटन अशा माध्यमातून हिंदी चित्रपटात अवतरले.
शिवसेनाप्रमुखांची चित्रपटसृष्टीतील उपस्थिती बऱ्याचदा मार्मिक-मिश्किल स्वरूपाची असल्याचे अनुभवास मिळाले, त्यांच्या बहुरंगी आयुष्याच्या ‘द एण्ड’ने अशाच काही आठवणींचा हा ‘फ्लॅशबॅक’ जागवला..’
शशिकलाने बऱ्याच वर्षांनी ‘लेक चालली सासरला’ या मराठी चित्रपटातून भूमिका साकारली तेव्हा तिला हा चित्रपट व त्याहीपेक्षा त्यातील आपली खाष्ट सासूची भूमिका कोणाला दाखवू नि कोणाला नको असे झाले; नि अशातच तिने शिवसेनाप्रमुखांसाठी ‘खास खेळा’चे आयोजन केले व आपले हेच ‘मोठेपण’ दाखविण्यासाठी आपण काही सिनेपत्रकारांनाही आमंत्रित केले. तेव्हा म्हणजे १९८४ साली त्यांच्याभोवती फारसे सुरक्षा कवच नव्हते. एकटा दिना त्यांचे संरक्षण करायला पुरेसा होता व दिलीप घाटपांडे त्यांच्या पाण्याची वगैरे व्यवस्था बघे. ‘साहेबां’शी थेट संवाद साधण्याची तेव्हा संधी होती. मध्यंतरला शशिकलाच्या भूमिकेबाबत त्यांना विचारताच ते म्हणाले, बाईंनी नकारात्मक भूमिका साकारली असली तरी बाई स्वभावाने वाईट नाही. घाबरून जावे असे तिच्यात तसे काही नाहीच..’ एकदा बी. आर. चोप्रा यांच्या जुहूच्या बंगल्यातच निर्माता प्रकाश देवळे याने शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते आपल्या ‘मायेची सावली’ या चित्रपटाच्या गाण्याच्या ध्वनिफितीचे प्रकाशन आयोजित केले. एक मराठी निर्माता (तो काही काळ शिवसेनेचा आमदार होता) जुहू येथे असा सोहळा आयोजित करतोय ही त्या काळात मोठीच बातमी होती. बाळासाहेबांच्या हजरजबाबीपणाचा प्रत्यय तेव्हाही आला. अजिंक्य देव सर्वादेखत त्यांना म्हणाला, हा चित्रपट मला सुपरस्टार करेल..
एक नजर.. : राजकारणाची ४६ वर्षे
यावर शिवसेनाप्रमुख पटकन म्हणाले, मला विचारल्याशिवाय हे कसे घडेल?..’ बाळासाहेवांचा पुत्र बिंदा ठाकरे ‘अग्निसाक्षी’द्वारे निर्माता म्हणून उभा राहिला. त्याने १९९४ च्या श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशीच दुपारी अंधेरीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुहूर्ताचे आयोजन केले. पार्थो घोषच्या दिग्दर्शनात नाना पाटेकर व मनिषा कोईराला प्रथमच एकत्र आले म्हणून मुहूर्ताला हजर राहणे भाग होतेच, पण गणपतीचा पहिला दिवस असल्याने नानाला माहीमच्या घरी धावायची घाई होती. ‘साहेब’ मात्र त्याला तसा सोडतात काय? ‘तुझा गणपती असा कसा पळून जाईल, थांब’ असे काहीसे दरडावत त्याला थांबवले.
मनोजकुमार पूर्वी ‘मातोश्री’वर नेहमी येई. एकदा त्याने बाहेरच्या बाजूतील एका मूर्तीबाबत शिवसेनाप्रमुखांकडे नाराजी व्यक्त केली. ‘ही मूर्ती कसेही करून काढा’ हा त्याचा आग्रह आम्हा उपस्थितांना आश्चर्यकारक होता, पण तो ऐकेनाच. काही दिवसांतच शिवसेनाप्रमुखांनी ती मूर्ती हटवली. योगायोग म्हणजे, तेव्हापासून शिवसेनेला खूप चांगले दिवस आले, १९८५ सालची मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकून शिवसेना महाराष्ट्रात झेपावली.
’ दादा कोंडके यांना दादरच्या कोहिनूर थिएटरमध्ये ‘सोंगाडय़ा’साठी मुक्काम वाढवून हवा होता. (मालकाने फक्त दोन आठवडे दिले होते) दादा ‘मातोश्री’वर धावले, शिवसेनाप्रमुखांपुढे लोटांगण घातले. तेव्हा मराठी चित्रपटाच्या न्याय-हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांनी कोहिनूर टॉकिजविरोधात तीव्र लढा दिला. त्यामुळे ‘सोंगाडय़ा’ने कोहिनूरमध्ये ५० आठवडे मुक्काम केला. त्यानंतर दादांनी पुढच्या काही चित्रपटांची सुरुवात करताना शिवसेनाप्रमुखांचे आभार मानले. ते वाचताच प्रेक्षक टाळ्या मारत.