गेले काही दिवस मी त्यांच्या उशाशी तासन्तास बसून त्यांची श्वास घेण्यासाठी सुरू असलेली धडपड बघत होतो. माझ्या मनात प्रार्थना होती. त्यांची मृत्यूशी चाललेली झुंज बघत होतो. प्रत्येक दिवशी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अधिक खडतर होत गेली. त्यांची ती मृत्यूशी चाललेली लढाई उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही थक्क करून गेली. आणि अगदी काही तासांपूर्वी मी त्यांच्या शांत, निश्चल, तलम वस्त्रात गुंडाळलेल्या पार्थिवाकडे बघत होतो.. तेव्हाही त्यांच्याकडे पाहून ते आपल्याला सोडून गेले आहेत, अशी कल्पना करणेही अशक्य आहे. बाळासाहेबांची उणीव त्यांच्या असंख्य शिवसैनिकांसह चाहत्यांनाही आता कायम जाणवणार आहे.
अमिताभ बच्चन
लाखो मुंबईकरांच्या आठवणीतून कायम जिवंत
आपल्याकडचे दिग्गज लोक जेव्हा आपल्यातून जातात तेव्हा ते खऱ्या अर्थाने आपल्यातून गेलेले नसतात. कारण ते आपल्या मनात जिवंत असतात. बाळासाहेब ठाकरे असेच लाखो मुंबईकरांच्या आठवणीतून कायम जिवंत राहणार आहेत.
महेश भट्ट
कधीही भरून न येणारे नुकसान
अखेर झुंज संपली आहे आणि ईहलोकीचा पवित्र प्रवास सुरू झाला आहे. बाळासाहेबांच्या कुटुंबियांचे जे नुकसान झाले आहे ते कधीही भरून न येणारे असे आहे. माझ्या सदिच्छा आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांबरोबर सदैव राहतील.
हेमामालिनी
बलदंड व्यक्तिमत्त्व
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एक बलदंड व्यक्तिमत्त्व होते. बाळासाहेब हे त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या बलदंड व्यक्तीप्रमाणेच होते. असंख्य लोकांचे श्रद्धास्थान होते. अत्यंत स्पष्टवक्ता असलेले बाळासाहेब तत्त्वांना ठाम होते.
रतन टाटा
उत्तुंग व्यक्तिमत्त्व
बाळासाहेब यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते आणि व्यक्ती कुठलीही तत्त्वप्रणाली मानणारी असली तरी बाळासाहेबांच्या बेधडक आणि आकर्षक वक्तृत्व शैलीने भारावून जात असे.
दीपक पारेख
अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या
बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब आणि आपली विचारधारा वेगळी होती. परंतु आपल्या नातेसंबंधांमध्ये ही मतभिन्नता कधीच आली नाही. त्यांच्यासोबत झालेल्या स्नेहभोजनादरम्यान त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
राहुल बजाज
‘महाराष्ट्र’ हा बाळासाहेबांचा अभिमान
शिवसेनाप्रमुखांच्या निधानाचे वृत्त कळताच ट्विटवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत बाळासाहेबांबाबत आदरही होता आणि भीतीही होतीे. ‘महाराष्ट्र’ हा बाळासाहेबांचा अभिमान आणि ध्यास होता. प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला बाळासाहेब नावाच्या योद्धय़ाची उणीव सतत जाणवत राहील.
आनंद महिंद्रा
नेहमीच ‘सिंह’ वाटले
बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनात आठवणी उचंबळून आल्या आहेत. मला ते कधीच महाराष्ट्राचा ‘वाघ’ नव्हे तर नेहमीच ‘सिंह’ वाटत आले आहेत. त्यांच्यासारख्या जिवलग मित्राचे जाणे जीवाला चटका लावणारे आहे.
दिलीपकुमार
अक्षयकुमार : त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या धाडसी वृत्तीचं मला नेहमीच अप्रूप वाटत आलं होतं. खरेखुरे वाघ होते ते.. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात सहभागी आहे.
अनुपम खेर : बाळासाहेब हे आरस्पानी होते. केवळ सवंग लोकप्रियतेसाठी म्हणून ते कधीच बोलत नसत. ज्यांच्यासाठी राष्ट्र महत्त्वाचे आहे अशा भारतातील काही मोजक्या नेत्यांपैकी ते एक होते. ते अत्यंत धाडसी आणि नेहेमीच मदतीसाठी तत्पर असणारे होते.
फेसबुक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त पसरताच सर्वत्र शोककळा पसरली. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बहुतेकांनी मग सोशल साईट्सचा आधार घेतला आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ट्विटरप्रमाणे फेसबुकवरही बाळासाहेबांच्या चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना महाराष्ट्राचा पोलादीपुरुष गेला अशी भावना व्यक्त केली; तर अनेकांनी आम्ही आता पोरके झालो, असे म्हटले आहे.