शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोरकाच झाला असल्याची प्रतिक्रिया गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली. बाळासाहेबांच्या आजाराचे वृत्त ऐकल्यानंतर यातूनही ते बाहेर पडतील, असे वाटले होते परंतु ईश्वराच्या इच्छेपुढे कोणाचेच काही चालत नाही. ठाकरे कुटुंबियांशी आमचे घरगुती संबंध होते आणि बाळासाहेबांनीही आम्हाला कायमच घरच्यासारखे मानले, असे लतादीदी म्हणाल्या.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण : बाळासाहेबांच्या रुपाने महाराष्ट्राने एक अष्टपैलू आणि अनुभवी नेतृत्त्व गमावले आहे. ते एक अद्वितीय राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक, संघटक, कलाप्रेमी आणि वक्ते होते.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे : मुंबईतून कम्युनिस्टांची पिछेहाट होत असताना एखाद्या झंझावातासारखा एक व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेबांचा उदय झाला. आपल्या वडीलांचा पुरोगामी वारसा त्यांनी निष्ठेने पुढे चालविला. त्यांची झुंजार वृत्ती कदाचित या आजारपणावर मात करू शकेल असे वाटत होते.
लालकृष्ण अडवाणी : कोणत्याही परिस्थितीत देशहिताशी तडजोड न स्विकारणारे त्यांचे देशप्रेम, त्यांचे असामान्य नेतृत्वगुण आणि सहृदय वृत्ती यामुळे त्यांची प्रत्येकावरच छाप पडत असे. त्यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणामध्ये कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असून भारताने राजकीय क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आज आपण गमावले आहे.        

Story img Loader