शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क मैदानाशी असलेले ॠणानुबंध लक्षात घेऊन शिवाजी पार्कवरच बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला, आणि राज्य सरकारनेही या बाबीशी सहमती दर्शविली. महान व्यक्तींसाठी विशेष बाब म्हणून वेगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्याची ही तिसरी घटना आहे.  शिवाजी पार्क मैदानावर अंत्यसंस्कार करण्यासाठी काल शिवसेनेने राज्य सरकारकडे परवानगी मागितल्यानंतर विशेष बाब म्हणून सार्वजनिक ठिकाणी अशी परवानगी देता येईल का, याबाबत सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालांचा अभ्यास करून व मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सरकारनेही या मागणीस अनुकूल निर्णय घेतला. अपवादात्मक परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी स्मशानभूमी जाहीर करून तेथे अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्याचे अधिकार महापालिका आयुक्ताना आहेत. त्यानुसार मुंबई पोलिस कायद्याच्या कलम ३५ नुसार पोलिसांनी विनंती करावी आाणि मुंबई महापालिका अधिनियम ४४० नुसार विशेष बाब म्हणून आयुक्तांनी ही जागा स्मशानभूमि म्हणून जाहीर करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. शिवाजी पार्कवर उद्यान गणपती मिंदर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या परिसरातील १०० चौरस मीटरची जागा स्मशानभूमी म्हणून जाहीर करून त्याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
यापूर्वी शिवेसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या निधनानंतर खारकर आळी येथील पदमाकर वैद्य ट्रस्टचे खाजगी मैदान तत्कालीन महापालिका आयुक्त के.पी. बक्षी यांनी महापालिका प्रांतिक अधिनियमाच्या कलम ३२२ नुसार तात्पुरती स्माशानभूमि म्हणून जाहीर केले होते. त्यानंतर त्या ठिकाणी दिघे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता त्या ठिकाणी दिघेंचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. स्वाध्याय परिवाराचे प्रमुख पांडुरंगशास्त्री आठवले यांचे देहावसान झाले त्यावेळी स्वाध्याय परिवाराच्या तत्वज्ञान विद्यापीठातच आठवले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात करण्यात आले.रविवारी त्याच पद्धतीने शिवाजी पार्कवर ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.     

Story img Loader