स्थळ : डोंबिवली स्टेशन..
वेळ : सकाळी साडेआठ-नऊची.. एरव्ही चाकरमान्यांच्या गर्दीने तुडुंब भरलेल्या स्टेशनावर रविवारी मात्र तुरळक गर्दी होती. गर्दीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची सुन्नता मात्र निश्चित होती. सर्वाचं गंतव्य स्थान एकच.. दादर, शिवाजी पार्क. एरव्ही गाडीला गर्दी आणि गर्दीला रांगडेपणाचं रूप. भजन-कीर्तन, मोबाइलवरची गाणी आणि गप्पाष्टकं.. मात्र, रविवारच्या गर्दीचा बाज वेगळाच होता. आव्वाज कुणाचा, शिवसेनेचा.. मुंबई आमच्या वाघाची, नाही कुणाच्या बापाची.. गर्व से कहो हम हिंदू है, हिंदू है.. अशा घोषणा. सर्वाच्या तोंडी लाडक्या ‘विठ्ठला’चंच नाव. असा ढाण्या वाघ होणे नाही, दसऱ्याला शिवतीर्थावर आता विचारांचं सोनं लुटायचं कसं.. चर्चेचं स्वरूप हे असं होतं. बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या जात होत्या.. आणि हळूच हातातल्या वृत्तपत्रातील छबीकडे पाहून हात जोडले जात होते..
दादर स्टेशन ते शिवाजी पार्क..
दादर स्टेशनात उतरून जत्थेच्या जत्थे रानडे रोडवरून सेना भवनाकडे जाणाऱ्या जनसागराला जाऊन मिळत होते. कुठेही आरडाओरड नाही की राडेबाजी नाही. सर्वत्र शांत-निशब्द वातावरण. मात्र, या वातावरणातही शिवसैनिकांच्या घोषणा अविरत सुरूच.. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शिवसैनिकांनी केलेली मानवी साखळी.. येणाऱ्याजाणाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय तर कुठे चहाची सोय.. ‘सर्वानी शांतता पाळा, कुणीही आततायीपणा करू नका.. आपले साहेब आपल्यात नाहीत, मात्र त्यांचे विचार आपल्यात निरंतर राहणार आहेत.. तेव्हा सर्वानी शांततेने शिवतीर्थावर जमायचंय आणि काही अनुचित होणार नाही याची काळजी घ्यायचीय.. घरी जाताना नीट जायचंय..’ अशा प्रेमळ सूचना वारंवार दिल्या जात होत्या..राडासंस्कृती जोपासलेल्या शिवसैनिकांचं हे शांत-संयमी रूप अभूतपूर्वच होतं.
प्रेमळ कानउघडणी
शिवाजी पार्कावरचं वातावरण भारावून टाकणारं. राज्यभरातून हजारो शिवसैनिक तहानभूक विसरून शिवतीर्थावर जमलेले. गर्दी होती पण त्यात शिस्तबद्धता होती. पोलिसांच्या सूचनांचे पालन आज्ञाधारक विद्यार्थ्यांसारखे केले जात होते. कोणी गर्दीतून घुसून अगदी पुढे जाण्याचा प्रकार केलाच तर ‘अरे, काय करतोयस. आम्हीही त्यासाठीच आलोय. साहेबांची शिकवण विसरलास का?’ अशी प्रेमळ कानउघडणी केली जात होती.. व्यासपीठावर सजावटीचं काम शिस्तबद्धरित्या सुरू होतं. व्यासपीठाच्या बाजूला इस्कॉन आणि सिद्धिविनायक भजनी मंडळातर्फे भक्तीगीतं गायली जात होती.. उन्हं चढत होती तरी शिवसैनिक जागचे हलत नव्हते..
मुस्लिम युवकांचीही उपस्थिती
शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी जमलेल्या गर्दीत मुस्लिम युवकांचीही उपस्थिती होती. माहीमहून आलेल्या या युवकांनी सकाळीच शिवतीर्थ गाठले होते. बाळासाहेबांवरील प्रेमापोटी आपण येथे आल्याचे त्यांनी नमूद केले.
महायात्रेत..
महायात्रा मुंगीच्या पावलाने पुढे जात होती. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी, झाडे, दुकाने, टॉवरची गच्ची, गॅलरी.. मिळेल त्या ठिकाणी जागा पटकावून महायात्रेची आणि बाळासाहेबांची छबी आपल्या मोबाइल, आयफोन, कॅमेरात टिपण्यासाठी अहमहमिका लागली होती.. महायात्रा पुढे जात होती आणि जनांचा प्रवाहो त्यापाठोपाठ जात होता.. अंत्यदर्शनानंतर अनेकांनी घराची वाट धरली. जाताना गाडीत प्रचंड गर्दी. घोषणा नाही की काही नाही.. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर धीरगंभीर भाव. मोबाइलमध्ये टिपलेली बाळासाहेबांची अखेरची छबी जो तो हृदयात साठवून ठेवत होता..
एक सुन्न महायात्रा पूर्ण झाली होती..!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा