.. मागे एकदा राज ठाकरे माझ्याकडे आले होते. ही फार जुनी गोष्ट आहे. म्हणजे बिंदा गेले ना, त्याच्याही आधीची ही गोष्ट आहे. बाळासाहेबांची तब्येत त्यावेळी बरी नव्हती. मी राज ठाकरेंना विचारलं की, ‘कसे आहेत बाळासाहेब?’ तर ते म्हणाले, ‘बाळासाहेबांना काही गाणी ऐकावीशी वाटताहेत आणि ते टेप ऐकतात. त्यामुळे तुमच्याकडे कॅसेट्स नेण्यासाठी आलोय.’ त्यावेळी माझ्याकडच्या बऱ्याचशा कॅसेट्स मी त्यांना दिल्या होत्या. म्हणजे त्याच्यावरुन मला कळलं की, त्यांना गाणं आवडतं.
बाळासाहेबांशी मुद्दामहून कधी गाण्यावर चर्चा होत नसे. राजकारण आमचा प्रांत नाही. पण कलावंतांचं मन लाभलेले बाळासाहेब राजकारणाबरोबरच संगीतातही रमत. मागे एकदा शिवउद्योग सेनेसाठी मी कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमात ते मला भेटले. कार्यक्रम संपल्यानंतर ते स्टेजवर आले आणि मला म्हणाले, ‘कमाल आहे. कमाल आहे, तुम्ही एका दमात इतका वेळ गाताहात. साडेतीन-चार तास झाले. मला फार आश्चर्य वाटतं.’
अशा आमच्या भेटी होत. त्यांचा-आमचा परिचय फार जुना. पण ओळख जुनी असली तरी भेटी क्वचितच होत. असं असलं तरी जेव्हा मी त्यांना भेटत असे तेव्हा ते माझ्याशी खूप छान बोलत. खूप जोक्स सांगत. भरपूर हसवत.बाळासाहेबांची पहिली भेट कधी, कुठे झाली हे स्मरत नाही? पण एक आठवण आहे. मी ‘ऐ मेरे वतन के लोगों’ गायले होते. त्यावेळी ते त्यांना फार आवडलं होतं. त्यांनी आवर्जून भेटून हे सांगितलं होतं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’च्या आधी मी ‘आएगा आनेवाला’ गायले होते. त्याचाही उल्लेख करून गाणं आवडल्याचं बाळासाहेबांनी सांगितलं होतं.
आमच्या एखाद्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं तर ते सहसा नाही म्हणत नसत. पण तब्येत बरी नसेल तर इलाजच नसतो. एरवी ते आवर्जुन येत. काही वर्षांपूर्वी आमच्या हॉस्पिटलसाठी पुण्याला आम्ही एक कार्यक्रम केला होता. बाळासाहेबांनाही बोलावलं होतं. या कार्यक्रमात त्यांनी हॉस्पिटलसाठी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली होती. त्या कार्यक्रमाला इतरही अनेक लोक आले होते. पण बाळासाहेबच एकटे होते ज्यांनी उठून आम्हाला देणगी जाहीर केली.
बाळासाहेबांचा आमचा जुना स्नेहसंबंध. भेटीगाठी होत नसतील, पण टेलिफोनवर चौकशी होतच असे. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मी कोल्हापुरात होते. तिथे मला कळलं की बाळासाहेबांची तब्येत बरी नाही. मी तिथून त्यांना फोन केला. विचारलं, ‘तब्येत कशी आहे?’
मला म्हणाले, ‘आता बरी आहे.’
‘कुठं आहात?’
म्हटलं – ‘मी कोल्हापुरात आहे.’
‘येणार केव्हा मुंबईत?’ – त्यांनी विचारलं.
म्हटलं – ‘येईन सात-आठ दिवसांनी’ तर त्यावर ते म्हणाले, ‘मग आल्यावर घरी या. मासळीबिसळी खाता की नाही?’
मी म्हटलं – ‘खाते, पण तिखट जास्त चालत नाही.’
तेव्हा ते अगदी प्रेमानं म्हणाले, ‘पण तुम्ही या. तुमच्यासाठी आम्ही स्पेशल मासळीचं जेवण करू. बसून गप्पा मारू.’
काही नातीच अशी असतात. जाणिवेच्या पातळीवरची. ज्यांना गरज नसते सततच्या भेटीगाठींची. अधूनमधून पत्र लिहिण्याची वा मुद्दामहून टेलिफोन करण्याची. जो तो आपापल्या ठिकाणी, पण एकमेकांबद्दल प्रेम-आदर बाळगून. बाळासाहेबांचं आणि आमचं नातं हे असंच होतं. कुठेही कृत्रिमपणा नाही. निव्वळ आणि निव्र्याज प्रेम, आपुलकी!’
बाळासाहेबांच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या गौरवग्रंथातून साभार
हृदयनाथ मंगेशकर
मला नेहमीच बाळासाहेब आणि तात्याराव सावरकर या दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये विलक्षण साम्य आढळलं. त्यांची उंची, त्यांचा कृशपणा, आवाज रेटून बोलण्याची पद्धत, स्पष्ट शब्दोच्चर आणि अंधश्रद्धेला न मानता विज्ञानाकडे झुकणारी वृत्ती, विशेषत: आपल्याच धर्माबद्दल जेव्हा कोणी अशा परखड भूमिकेतून बोलतो तेव्हा तो लोकप्रिय न होता अप्रियच होत जातो. पण काही बुलंद व्यक्तिमत्त्वं असतात जी अशा गोष्टींची पर्वा करीत नाहीत. सावरकर उत्तम कवी होते, पण परखडपणे बोलायचेही. मात्र तरीही ते सावध होते. तुरुंगवास किंवा वयामुळे असेल. पण कायद्याच्या कटाटय़ात न अडकता प्रहार करण्याचा सावधपणा त्यांच्या ठायी होता. पण बोलण्यातला एक बेबंदपणा जो कलाकारामध्ये असतो तो बेबंदपणा मला बाळासाहेबांमध्ये दिसला. द्रष्टे असतात ते त्यांच्या काळात कधीच लोकप्रिय होत नाहीत. पुढच्या काळात त्यांची महती पटते. बाळासाहेबांचे भाग्य थोर की त्यांचा द्रष्टेपणा त्यांच्यासमोरच सिद्ध होत गेला. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. महाराष्ट्रात इतकं लोकप्रिय व्यक्तिमत्त्व मी दुसरं कुठलं पाहिलं नाही. त्यांच्या द्रष्टेपणा त्यांच्याच साक्षीने सिद्ध होत गेल्याने त्यांनी विलक्षण उंची गाठली.
ना. धों. महानोर
बाळासाहेब ठाकरे यांना विशेषत: राजकारणात जे यश प्रत्यक्ष मिळालं, सरकार स्थापन केलं याची अनेक कारणं चर्चिली गेली. मला बारकाईने महाराष्ट्रभर फिरताना व विचार करताना एक गोष्ट ठळकपणाने दिसून आली ती ही की, महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागातल्या ज्यांना कधी राजकारणात स्थानच नव्हतं, अशा लहानलहान जाती-जमाती, समाज, गावकुसाबाहेरचेच नव्हे, तर थेट वाडी-वस्तीत भटकंतीत असलेले सगळे दुर्लक्षित घेऊन त्यांना बाळासाहेबांनी तिकिटं, सत्ता देऊन ग्रामपंचायत,महापालिकांत, आमदार-खासदार म्हणून निवडून आणत राजकारण- समाजकारणाच्या प्रवाहात आणलं. मोठं केलं. या लहान जातींचंच मोठं संघटन झालं. वरपांगी हे दिसून येणार नाही. म्हणून त्यांना एवढे बलवत्तर पुढारी व दीर्घकालीन राजकारण मोडता आलं. केवळ सामान्य लहान-लहान दुर्लक्षितांना राजकारणात सामावून घेतल्यामुळे. ही सगळ्यात मोठी परिवर्तनाची घटना बाळासाहेब ठाकरेंनी करून दाखविली. खेडय़ात व शहरातही ४५ टक्के दारिद्रय़रेषेखाली असलेला, एकवेळेला उपाशी राहणरा माणूस, कुटुंब यासाठी एक-दोन रुपयात झुणका-भाकर दिली ही सामान्य गोष्ट नाही. ती नंतर नीट न राबवल्याने त्रुटी आल्या; परंतु ही फार मोठी गोष्ट. स्पष्टपणाने मला वाटतं ते मी बोलीन. त्याचे सगळे परिणाम अंगावर झेलीन असा स्वभावाचा भाग सर्वत्र ठामपणाने जपणारे कठोर बाळासाहेब मला माझ्यापुरते सतत दिसले..
बाळासाहेब ठाकरे दहशतवादी नव्हते का?- मुशर्रफ
अजित वाडेकर
बाळासाहेबांशी माझा स्नेहसंबंध जुळला तो दादर, शिवाजी पार्कच्या मोकळ्या रस्त्यावरील मी व माझ्या सहकाऱ्यांच्या व्रात्यपणामुळे. बाळासाहेब आम्हाला सीनियर होते. रस्त्यांवर लहानपणी क्रिकेट खेळणे हा आमचा नेहमीचाच परिपाठ असायचा. आमच्या गोंगाटावर बाळासाहेबांचे वडील, प्रबोधनकार ठाकरे कधीकधी गमतीने आमच्यावर ओरडायचे. लहानपणी आम्ही त्यांना खूप घाबरून असायचो. अशावेळी बाळासाहेब आमची बाजू सांभाळून धरायचे. हाच स्नेह पुढे वृध्दिंगत होत गेला. शिवाजी पार्कवर आमची कांगा क्रिकेट स्पर्धेतील लढत असली की बाळासाहेब स्वत: एखादी चक्कर तरी तेथे आवर्जून टाकायचे. अगदी माझ्या गौरवनिधीसाठी त्यांनी केलेली मदत मी केंव्हाच विसरू शकत नाही. बसच्या गर्दीतून मुंबई भटकणारे, लोकलमधील मोकळ्या जागेत दाटीवाटीने उभे राहून फ्री प्रेसमधील कार्यालयात जाणारे अन् झेड सुरक्षा व्यवस्थेत वावरणारे बाळासाहेब, अशी बाळासाहेबांची सर्व रूपं मी जवळून पाहिली. म्हणूनच मी स्वानुभवावरून खात्रीने सांगतो की, बाळासाहेबांनी त्यांच्यातील त्या साध्या माणसाला कधीच दडपू दिले नाही. त्यांच्या सडेतोडपणामुळे बरेचजण दुखावले गेले असतील, पण चुकीला चूकच म्हणण्याची धमक त्यांनी दाखविली. बाळासाहेबांनी कधी शब्द फिरविल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही.