गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यातच उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन स्मारकाबाबत अधिकृत घोषणा केली. ‘लोकसत्ता’ने गेल्या बुधवारीच यासंदर्भात सर्वप्रथम वृत्त दिले होते.
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक महापौर बंगल्यात?
फडणवीस म्हणाले, स्मारकाच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या अखत्यारित एक सार्वजनिक विश्वस्त संस्था (पब्लिक ट्रस्ट) तयार करण्यात येईल. या ट्रस्टचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे करतील. त्यांच्या मार्गदर्शनानुसार स्मारकाची उभारणी करण्यात येईल. पुढील स्मृतिदिनापर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या ट्रस्टमध्ये कोणकोणते सदस्य असतील, याचा निर्णय राज्य सरकार उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून घेईल. राज्याचे मुख्य सचिव या ट्रस्टमध्ये असतील. महापौर बंगला हेरिटेज वास्तू असल्यामुळे तो पाडण्याचा प्रश्नच येत नाही. बंगला न पाडता त्यामध्ये स्मारक उभारण्यात येईल. याबद्दल अधिक माहिती लवकरच माध्यमांना देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे यांचे उचित स्मारक व्हावे, ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती. गेल्या स्मृतिदिनावेळी यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या नेतृत्त्वाखाली समिती नेमली होती. या समितीने एकूण आठ जागांची पाहणी केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर महापौर बंगला हेच स्मारकासाठी निश्चित करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.
महापौर बंगल्यात स्मारक तयार करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ते म्हणाले, शिवाजी पार्क आणि महापौर बंगला या वास्तूंवर बाळासाहेबांचे वेगळे प्रेम होते. प्रत्येक शिवसैनिकाचेही यावर प्रेम आहे. त्यामुळेत महापौर बंगल्यातच स्मारक उभारणे उचित ठरेल, असे आम्हाला वाटले. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व चौकटीत बंदिस्त करणे अवघड आहे. तरीही त्यांचे विचार काय होते, हे जगापर्यंत पोहोचविण्यासाठी हे स्मारक उपयुक्त ठरेल. त्यादृष्टिनेच त्याची रचना करण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा