बाळासाहेब आणि माझी मैत्री शिवसेनेच्या जन्मापासूनची आहे. आर. के. लक्ष्मणनंतर बाळासाहेबांएवढा प्रभावी व्यंगचित्रकार मी पाहिला नाही. अनेक पानांचे विचारप्रवर्तक लेख एका बाजूला आणि बाळासाहेबांची व्यंगचित्रे एका बाजूला असायची. त्यांचे कार्टून प्रचंड काही तरी सांगून जायचे. त्यांची शिवाजी पार्कवरील पहिली सभा मी उभे राहून ऐकली होती. तिथे शिवसेनेचा जन्म झाला. त्यांच्या काही भूमिका अतिशय स्वच्छ होत्या. बाळासाहेब स्वत साम्यवादी विचारांचे कडवे विरोधक होते. त्यावेळी मुंबईच्या गिरणगावावर कॉम्रेड डांगेंचा प्रचंड पगडा होता. तो कुठल्याही परिस्थितीत उद्ध्वस्त करायचा आणि त्यातून गिरणगावच्या कामगाराला बाहेर काढायचे, ही भूमिका त्यांनी घेतली होती. अभेद्य महाराष्ट्राच्या सीमाप्रश्नावर त्यांनी संघर्षांची भूमिका घेतली. त्या आंदोलनात मोरारजीभाईंना अडविण्याचा निर्णय घेतला. त्यातून गोळीबार झाला. अनेक तरुण मृत्युमुखी पडले आणि मुंबई पेटली. या आंदोलनातून शिवसेनेची जबरदस्त ताकद प्रस्थापित झाली आणि त्यांनी महापालिकेची सत्ताच काबीज केली. वामनराव महाडिक, विजय गावकर, दत्ता नलावडे यांच्यासारख्या सामान्य माणसांच्या नेतृत्वाची फळीच त्यांनी उभी केली आणि त्यातून कोकणावरही आपला पगडा बसविला. बाळासाहेब हे असे व्यक्तिमत्व होते की ज्यांना एखादी गोष्ट पटली तर त्याचे परिणाम काय होतील याचा त्यांनी कधी आयुष्यात विचार केला नाही. उदाहरणार्थ, देशात आणीबाणी आली. त्यावेळी आणीबाणीला उघडपणे समर्थन करण्याचे काम बाळासाहेबांनी केले. नेभळट लोकशाही नको, असे त्यांचे म्हणणे होते. कळत नकळत ते हिटलरपर्यंत जायचे. आमचे त्यांच्या घरी येणे जाणे असायचे. सुप्रिया त्यावेळी सहा महिन्यांची, एक वर्षांची होती. मीनाताईंच्या अंगाखांद्यावर खेळलेली. ज्यावेळी सुप्रियाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेसाठी जाहीर केली. तिचा उमेदवारी अर्ज भरायचा होता. साहजिकच अपेक्षा होती की काँग्रेस-राष्ट्रवादीची उमेदवार असलेल्या सुप्रियाविरुद्ध सेना-भाजप उमेदवार देणार. त्यावेळी बाळासाहेबांचा फोन आला. म्हणाले, काय शरदबाबू काय चालले आहे? मी ऐकले आहे की सुप्रिया राज्यसभेचा अर्ज भरणार. म्हटले होय. तुम्हाला काही वाटते काय, मला सांगायचेही नाही. म्हटले बाळासाहेब तुमचा उमेदवार उभा राहणार म्हणून सांगितले नाही. म्हणाले, सुप्रियाची पहिली निवडणूक आहे आणि आमचा उमेदवार उभा राहणार? हे काही तुम्ही योग्य नाही केले. तुम्ही सांगायला पाहिजे होते, असे बाळासाहेब म्हणाले. मी म्हटले, पण भाजप तुमचा मित्रपक्ष आहे.. ते काही नाही. सुप्रिया अविरोध निवडून येणार. शिवसेना-भाजपचा उमेदवार उभा राहणार नाही. दुसरा कुणी उमेदवार उभा राहिला तर मला माहिती नाही. पण शिवसेना-भाजपचा उमेदवार उभा राहणार नाही, असे बाळासाहेब म्हणाले आणि सुप्रिया राज्यसभेवर अविरोध निवडून गेली. बाळासाहेबांमध्ये मनाचा मोठेपणा होता. दिलदारपणा होता. बाळासाहेब हा मी असा नेता पाहिला की ज्याच्यासाठी जीव टाकणाऱ्या तरुणांची फळीच्या फळी उभी झाली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत बाळासाहेबांचे योगदान मौल्यवान आहे. त्यांच्या जाण्याने न भरून काढण्यासारखे नुकसान झाले आहे. त्यांची उणीव सदैव भासत राहील आणि त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. बाळासाहेबांचे अखेरचे दर्शन घेण्याची माझी इच्छा होती. पण दुर्दैवाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी मी अहमदाबादमध्ये आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. बाळासाहेबांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
-सचिन तेंडुलकर, महान क्रिकेटपटू.
बाळासाहेब हे एका योद्धय़ासारखे होते, मृत्यूशीही त्यांनी झुंज दिली. त्यांचे प्रेम आणि संघर्ष दोन्ही उत्कट असायचे. आपल्या धोरणांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांच्या निधनाने राष्ट्रनिष्ठेचे एक प्रतीक आपण गमावले आहे.
नरेंद्र मोदी
एक दिग्गज राजकारणी आपल्यातून निघून गेला आहे. देशाच्या राजकारणावर इतकी छाप सोडून जाणारे बाळासाहेबांसारखे राजकारणी गेल्या ६५ वर्षांत मी क्वचितच पाहिले.
लालकृष्ण आडवाणी
परखड वक्तृत्व, कठोर कर्तृत्व आणि धाडसी नेतृत्व अशा अनेक गुणवैशिष्ठय़ांनी युक्त, जनमनावर पकड असलेला व अनेकांना आपला व्यक्तिगत आधार वाटणारा हिंदूत्वनिष्ठ ज्येष्ठ नेता काळाने आपल्यातून हिरावून घेतला आहे. केवळ शिवसेनेचीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या, देशाच्या सामाजिक व राजकीय जीवनाची मोठी हानी झाली आहे. सत्याचा आधार न सोडता िहमत व स्पष्टपणे मनवचनकर्मपूर्वक आचरण करीत राहण्याचा वस्तुपाठ सर्वानाच अनुकरणीय आहे.
मोहन भागवत
बाळासाहेबांनी शिवसेनेचा यज्ञ ४५ वर्षांपूर्वी चेतविला, तेव्हापासून त्यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य मला लाभले. लाखो मराठी माणसांचे ते आधारस्तंभ होते. राजकारणापेक्षा सामाजिक कामांत त्यांना अधिक रस होता व त्यांनी नवीन पिढी घडविली. दुसऱ्यांच्या घरी वार लावून जेवणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य मुलाला त्यांनी खूप मोठे केले आणि अनेक महत्त्वाची पदे दिली. बाळासाहेब हे वक्ता दशसहस्त्रेषु होते. त्यांचे विचार समाजमार्गदर्शकाप्रमाणे चिरंजीव राहतील.
मनोहर जोशी
लढाऊ नेतृत्व हरपले
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने महाराष्ट्र एका लढाऊ नेतृत्वाला मुकला आहे. एक राजकीय नेता, व्यंगचित्रकार, संपादक, कलाप्रेमी, फर्डा वक्ता असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. मराठी माणसाच्या हितरक्षणाचा मुद्दा घेऊन त्यांनी शिवसनेची स्थापना केली. मराठी माणसाच्या रोजगाराचा प्रश्न असेल किंवा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न असेल, त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेले प्रत्येक आंदोलन प्रभावी ठरले. बाळासाहेबांचे भाषण म्हणजे साऱ्यांच्याच उत्सुकतेचा विषय असायचा. श्रेत्यांच्या काळजाचा ठाव घेणारे, थेट आणि बेधडक वक्तृत्व, कमालीचा स्पष्टवक्तेपणा, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता केलेली टीका, ही त्यांच्या भाषणाची वैशिष्टय़े होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका अनुभवी व बहुआयामी व्यक्तिमत्वाला मुकला आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण</strong>
बाळासाहेब व्यक्ती नव्हे संस्था
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने देशातील प्रत्येक माणसाला धक्का बसला आहे, बाळासाहहेब एक व्यक्ती नव्हते तर ते एक संस्था होते. बाळासाहेबांची लोकप्रियता अफाट होती. ते भक्कम जनाधार असणारे नेते होते. वैयक्तिक पातळीवर राजकारणाच्या पलिकडे ते सर्वाचेच एक प्रेमळ हृदयाचे मित्र होते.
राज्यपाल के. शंकरनारायणन
पितृतुल्य व्यक्तिमत्व गमावले
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधानाने देश एका पितृतुल्य व्यक्तिमत्वाला मुकला आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य केले. पत्रकार, व्यंगचित्रकार, सामाजिक-राजकीय अनिष्ट प्रवृत्तीवर फटकारे लगावणारे बाळासाहेब ठाकरे यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज गमावला आहे.
आर.आर.पाटील
दिलदार, पारदर्शक व्यक्तिमत्व
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एक दिलदार व्यक्तिमत्व. मनात एक आणि तोंडावर एक असे कधीच नव्हते. कट-कारस्थान, संशय याला त्यांच्याकडे थारा नव्हता. एखादी गोष्ट पटली नसल्यास ते मला तोंडांवर सांगायचे आणि आवडल्यास स्तुती करायचे. शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, ५५ उड्डाणपूल आदी मोठे प्रकल्प त्यांचे स्वप्न होते. त्याबद्दल ते माझे कौतुक करायचे. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे दैवत होते. आपले काम हे शिवाजी महाराजांप्रमाणे असावे आणि राज्यात शिवशाही यावी, असे ते म्हणत असत. माझा मोठा आधार आणि पालकच हरपला आहे.
नितीन गडकरी
निपक्षपाती, पितृवत
शिवसेना-भाजप युतीचा आधारस्तंभ हरपला आहे. गेली ५०वर्षे महाराष्ट्राच्या मनावर ठाकरे यांनी राज्य केले. बाळासाहेब आपली भूमिका कणखरपणे मांडत असत. राजकीय यशापयशाचा कोणताही विचार न करता ते आपल्या भूमिकेवर ठाम रहात होते. युतीचे ते केवळ मार्गदर्शक नव्हते, तर आधारवडच होते. कोणत्याही बाबतीत ते बिनतोड आणि निर्भयपणे बोलत असत. त्यांच्या भाषेला ‘ठाकरी शैली’ असेच संबोधिले जात असे. त्यांच्याकडे एखादा प्रश्न गेल्यावर दोन्ही बाजू ऐकून घेऊन ते निपक्षपातीपणे निर्णय घेत. माझ्यावर त्यांचे पुत्रवत प्रेम होते. आमचा वडीलकीचा आधारच गेला.
गोपीनाथ मुंडे
इतिहास घडविणारा नेता हरपला
‘महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच, अशी गर्जना करून ती खरी करून दाखविणारा, महाराष्ट्रात आणि देशात एक नवा इतिहास घडविणारा नेता हरपला. बाळासाहेब हे केवळ राजकीय नेते नव्हते तर जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार होते. राजकारणात आले नसते तर ते आणखी मोठे व्यंगचित्रकार झाले असते. त्यांच्या नेतृत्वाखाली २५ वर्षे मी शिवसेनेत काम केले. ते केवळ संघटनेचे प्रमुख होते, असे नाही; तर साऱ्या शिवसैनिकांचे कुटुंबप्रमुख होते. त्यांनी एखादी गोष्ट करण्याचा आदेश दिला की, त्याची पूर्तता करण्यासाठी प्राणाची बाजी लावायलाही शिवसैनिक तयार असत. मी शिवसेना सोडल्यानंतर आमच्यात संघर्ष झाला. परंतु सारे विसरून जेव्हा मी सहकुटुंब त्यांना भेटायला गेलो, त्यावेळी त्यांनी अतिशय प्रेमाने आमचे स्वागत केले. बाळासाहेबांचे प्रेम दिखाऊ कधीच नसायचे. मी शिवसेना सोडली त्याचा पश्चाप होत नाही, परंतु त्यांच्या प्रेमाला मुकलो याची खंत आहे.
छगन भुजबळ
अखेरची भेट झाली नाही याचे शल्य जीवनभर राहील
ज्यांनी मला राजकारणात घडविले, ज्यांच्या आशीर्वादाने शाखाप्रमुख ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचण्याची संधी मिळाली, त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अखेरची भेटही होऊ शकली नाही, हे शल्य जीवनभर माझ्या मनात राहील. बाळासाहेब म्हणजे माणुसकीचा झराच होते. त्यांच्या प्रेमळ स्वभावाने सर्व क्षेत्रातील मान्यवरांना त्यांनी आपले मित्र केले होते. बाळासाहेबांवरील प्रेम व विश्वासामुळे शिवसैनिक त्यांच्यावरून जीव ओवाळून टाकायला तयार असत. व्यक्तिश: मला त्यांचे खूप प्रेम मिळाले. त्यांचा माझ्यावर मोठा विश्वास होता. त्यांनीच मला घडविले. शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता ही सारी पदे मला त्यांच्यामुळे मिळाली. काही वेगळ्या परिस्थितीत पक्ष सोडण्याचा मला निर्णय घ्यावा लागला. त्यांना त्रास झाला, त्याचे मलाही दु:ख आहे. त्यांची तब्येत खालावत असताना भेटण्याची तीव्र इच्छा होती. परंतु ते घडले नाही, त्याचे दु:ख मला आयुष्यभर राहणार आहे. बाळासाहेबांच्या निधनामुळे उद्धव व राज यांच्यावर संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत त्यांना या संकटाचा सामना करण्याची परमेश्वर शक्ती देवो.
नारायण राणे