बाळासाहेब आणि माझी मैत्री शिवसेनेच्या जन्मापासूनची आहे. आर. के. लक्ष्मणनंतर बाळासाहेबांएवढा प्रभावी व्यंगचित्रकार मी पाहिला नाही. अनेक पानांचे विचारप्रवर्तक लेख एका बाजूला आणि बाळासाहेबांची व्यंगचित्रे एका बाजूला असायची. त्यांचे कार्टून प्रचंड काही तरी सांगून जायचे. त्यांची शिवाजी पार्कवरील पहिली सभा मी उभे राहून ऐकली होती. तिथे शिवसेनेचा जन्म झाला. त्यांच्या काही भूमिका अतिशय स्वच्छ होत्या. बाळासाहेब स्वत साम्यवादी विचारांचे कडवे विरोधक होते. त्यावेळी मुंबईच्या गिरणगावावर कॉम्रेड डांगेंचा प्रचंड पगडा होता. तो कुठल्याही परिस्थितीत उद्ध्वस्त करायचा आणि त्यातून गिरणगावच्या कामगाराला बाहेर काढायचे, ही भूमिका त्यांनी घेतली होती. अभेद्य महाराष्ट्राच्या सीमाप्रश्नावर त्यांनी संघर्षांची भूमिका घेतली. त्या आंदोलनात मोरारजीभाईंना अडविण्याचा निर्णय घेतला. त्यातून गोळीबार झाला. अनेक तरुण मृत्युमुखी पडले आणि मुंबई पेटली. या आंदोलनातून शिवसेनेची जबरदस्त ताकद प्रस्थापित झाली आणि त्यांनी महापालिकेची सत्ताच काबीज केली. वामनराव महाडिक, विजय गावकर, दत्ता नलावडे यांच्यासारख्या सामान्य माणसांच्या नेतृत्वाची फळीच त्यांनी उभी केली आणि त्यातून कोकणावरही आपला पगडा बसविला. बाळासाहेब हे असे व्यक्तिमत्व होते की ज्यांना एखादी गोष्ट पटली तर त्याचे परिणाम काय होतील याचा त्यांनी कधी आयुष्यात विचार केला नाही. उदाहरणार्थ, देशात आणीबाणी आली. त्यावेळी आणीबाणीला उघडपणे समर्थन करण्याचे काम बाळासाहेबांनी केले. नेभळट लोकशाही नको, असे त्यांचे म्हणणे होते. कळत नकळत ते हिटलरपर्यंत जायचे. आमचे त्यांच्या घरी येणे जाणे असायचे. सुप्रिया त्यावेळी सहा महिन्यांची, एक वर्षांची होती. मीनाताईंच्या अंगाखांद्यावर खेळलेली. ज्यावेळी सुप्रियाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेसाठी जाहीर केली. तिचा उमेदवारी अर्ज भरायचा होता. साहजिकच अपेक्षा होती की काँग्रेस-राष्ट्रवादीची उमेदवार असलेल्या सुप्रियाविरुद्ध सेना-भाजप उमेदवार देणार. त्यावेळी बाळासाहेबांचा फोन आला. म्हणाले, काय शरदबाबू काय चालले आहे? मी ऐकले आहे की सुप्रिया राज्यसभेचा अर्ज भरणार. म्हटले होय. तुम्हाला काही वाटते काय, मला सांगायचेही नाही. म्हटले बाळासाहेब तुमचा उमेदवार उभा राहणार म्हणून सांगितले नाही. म्हणाले, सुप्रियाची पहिली निवडणूक आहे आणि आमचा उमेदवार उभा राहणार? हे काही तुम्ही योग्य नाही केले. तुम्ही सांगायला पाहिजे होते, असे बाळासाहेब म्हणाले. मी म्हटले, पण भाजप तुमचा मित्रपक्ष आहे.. ते काही नाही. सुप्रिया अविरोध निवडून येणार. शिवसेना-भाजपचा उमेदवार उभा राहणार नाही. दुसरा कुणी उमेदवार उभा राहिला तर मला माहिती नाही. पण शिवसेना-भाजपचा उमेदवार उभा राहणार नाही, असे बाळासाहेब म्हणाले आणि सुप्रिया राज्यसभेवर अविरोध निवडून गेली. बाळासाहेबांमध्ये मनाचा मोठेपणा होता. दिलदारपणा होता. बाळासाहेब हा मी असा नेता पाहिला की ज्याच्यासाठी जीव टाकणाऱ्या तरुणांची फळीच्या फळी उभी झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा