बोरिवलीतील मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र योजनेअंतर्गत दवाखान्यांमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. कुलुपवाडी, एक्सर, गोराई येथील दवाखान्याची डागडुजी करून ते बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रांतर्गत दवाखान्यात रूपांतरित करण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>>मुंबईत गोवर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ; महिनाभरात ५०० हून अधिक रुग्ण गोवरमुक्त
मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र योजना आखली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या (२०२२-२३) अर्थसंकल्पात त्याची घोषणा करण्यात आली होती. घराशेजारी आरोग्य केंद्र व वैद्यकीय तपासणी करता यावी यासाठी ही योजना आखण्यात आली होती. बहुतांशी वेळा लहानसहान आजारांसाठी नागरिक उपनगरातून प्रमुख रुग्णालयात येतात. प्रमुख रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने दात, त्वचा, कान आदींशी निगडीत आजारांचे रुग्ण येत असून त्यामुळे या रुग्णालयांवर ताण वाढत आहे. त्यामुळे अधिक गुंतागुंतीच्या उपचारांसाठीच्या रुग्णसेवेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे जागा उपलब्ध होईल अशा ठिकाणी कंटेनरमधील दवाखाने सुरू करण्यात येणार होते. त्याचबरोबर महानगरपालिकेचे सध्याचे दवाखाने अद्ययावत करून त्यात रुग्णांच्या १३९ प्रकारच्या विविध चाचण्या व उपचार करता यावेत याकरीता महानगरपालिकेने ही योजना आखली. त्यानुसार बोरिवली परिसरातील कुलुपवाडी, एक्सर, चारकोप, गोराई येथील दवाखान्यांची दुरुस्ती करून ते अद्ययावत करण्यात येणार आहेत. या कामासाठी एकूण पाच कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.