शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती नाजूक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्‍यात आले असल्याचे पीटीआयचे वृत्त आहे. सर्वच वृत्त वृत्तवाहिन्यांवरूनही या बातमीला दुजोरा दिला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह शिवसेनेचे प्रमुख नेते मातोश्रीवर दाखल झाले आहेत. बाळासाहेबांच्या प्रकृतीची बातमी कळताच मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्य़ा प्रमाणावर जमा झाले आहेत. त्यामुळे ‘मातोश्री’बाहेर पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे.
शिवसैनिकांनी शांतता राखाण्याचे आवाहन ‍शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती नाजूक असून डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बाळासाहेबांच्या जवळजवळ सर्व अवयवांनी काम करण्याचे बंद केले असल्याने ते डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देत नाहीयेत. त्यामुळे आता डॉक्टरांनी सर्व काही देवाच्या हवाली सोडले आहे.
शिवसेनेचे अनेक महत्वाचे नेते मातोश्रीवर दाखल झाले असून त्यामध्ये मनोहर जोशी, अनिल देसाई, संजय राऊत, सुभाष देसाई, विनायक राऊत, रामदास कदम, दिनकर रावते यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अभिनेते अमिताभ आणि अभिषेक बच्चन, आणि संजय दत्त आपली पत्नी मान्यतासह मातोश्रीवर पोहचले आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ हेसुध्दा मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, धारावीहून कलानगरच्या दिशेने जाणा-या रस्त्यावर शिवसैनिकांनी काही गाड्यांची तोडफोड केल्याचे वृत्त आहे.

Story img Loader