विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योग आणि विविध मुद्द्यांवर शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. आज ( १७ जुलै ) विधानसभेत काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, “राज्यातील पावसाची परिस्थिती गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. राज्यातील ५० टक्के जास्त भागात पाऊस नसल्याने केवळ २० टक्के पेरण्या झालेल्या आहेत. शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. अतिवृष्टी आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. कांद्याला ३५० रुपये अनुदान जाहीर केलं. पण, ती मदतही पोहचली नाही.”
“बाजारात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे आली आहेत. काही टोळ्या सरकारी असल्याचं दाखवून हफ्ते वसुली करत आहेत. पण, दुर्दैवाने सरकारचं शेतकऱ्यांकडे कोणतेही लक्ष नाही. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, दिल्ली दौऱ्यामुळे शेतकरी आणि महाराष्ट्राकडे दुर्लक्ष सरकारचं झालं आहे,” अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देत म्हटलं की, “काही भागात पाऊस कमी असल्याने पेरण्या होऊ शकल्या नाहीत. मागील वर्षीच्या तुलनेत ८० टक्केच पेरण्या झाल्या आहेत. पुणे आणि नाशिक विभागात पेरण्यात कमी झाल्या आहेत. हवामान विभागाने पुढील आठवड्यात पाऊस सांगितलं आहे. त्यामुळे पेरण्या योग्य प्रकारे होतील.”
“याबाबत एका समितीची स्थापना केली आहे. दुबार पेरण्याची करण्याची वेळ आली, तर सरकारने एक आखणी केली आहे. गेल्या वर्षभरात १० हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. नियमीत कर्ज भरणाऱ्या साडेसोळा लाख शेतकऱ्यांपैकी फक्त ५० हजार जण बाकी आहेत. बाकी सर्वांना कर्जवाटप करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिल,” असे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे.