काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलीच्या नावाचं ट्विटरवर फेक अकाऊंट तयार करण्यात आलं. या अकाऊंटवरून नियमितपणे ट्वीट्स केले जात होते. विशेष म्हणजे हे अकाऊंट खरं मानून काँग्रेस नेते बंटी पाटलांसह अनेकांनी त्या अकाऊंटला फॉलो केलं होतं. मात्र, आता बाळासाहेब थोरात यांनीच याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “माझी कन्या शरयू देशमुख यांच्या नावे सुरू असलेले ‘@SharayuDeshm’ हे ट्विटर अकाउंट खोटे आहे. त्या संदर्भात पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. कृपया याची नोंद घ्यावी. ट्विटर इंडिया आणि महाराष्ट्र सायबर विभागानेही याची दखल घ्यावी.”
ट्विटरवरील हे खातं तयार करताना आरोपींनी शरयु देशमुख यांच्या फोटोंचा वापर केला होता. डीपीसाठी व्यक्तिगत शरयु देशमुख यांचा फोटो, तर कव्हर फोटो म्हणून थोरात कुटुंबाचा फोटो लावण्यात आला होता.
बाळासाहेब थोरात यांनी या अकाऊंटची तक्रार केल्यानंतर आता ट्विटरवर हे खातं बंद झालं आहे. बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलेल्या युजर आयडीवर क्लिक केल्यावर हे खातं अस्तित्वात नसल्याचं नोटिफिकेशन दाखवलं जात आहे.