सावित्रीबाई फुले यांची बदनामी करणारं लिखाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतली. तसेच सावित्रीबाईंवर इतकं अश्लील लिखाण करूनही दोषींवर कारवाई झाली नाही, असं म्हणत सरकार त्यांना पाठिशी घालत असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच ते गुरुवारी (२७ जुलै) पावसाळी अधिवेशनात बोलत होते.
“राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा, अन् सावित्रीबाईंवर अश्लील लिहिणाऱ्यांवर कारवाई नाही”
बाळासाहेब थोरात म्हणाले, “सावित्रीबाई फुलेंविषयी आपल्या सर्वांना आदर आहे. दुर्दैवाने त्यांच्यावर असं लिहिलं जातं आणि अजूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. राहुल गांधी संसदेत असं काय बोलले होते की, त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंविषयी असं लिहिल्यानंतर काहीही होत नाही.”
हेही वाचा : सावित्रीबाईंवरील अश्लील पोस्ट आणि चित्रांवरून जितेंद्र आव्हाड आक्रमक, म्हणाले, “मोठ्या राजकारण्यांविषयी…”
व्हिडीओ पाहा :
“सावित्रीबाईंवर अश्लील लिहिणाऱ्याला मुसक्या बांधून रस्त्यावरून फिरवलं पाहिजे”
“हे अत्यंत दुर्दैवी आहे. शासन आरोपींना पाठिशी घालत आहे असं आमचं मत आहे. हे असं लिहिणाऱ्याला मुसक्या बांधून आणलं पाहिजे आणि रस्त्यावरून फिरवलं पाहिजे. त्यांनी इतकं वाईट लिहिलं आहे. सरकारकडून आमच्या अपेक्षा आहेत. हे असे गुन्हेगार आहेत ज्यांच्या मुसक्या बांधून रस्त्यावर फिरवलं पाहिजे. सरकार ते कधी करणार हे त्यांनी सांगावं,” असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
सावित्रीबाई फुलेंवरील अश्लील लिखाणावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
दरम्यान, जितेंद्र आव्हाड म्हणाले, “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह लेख लिहिण्यात आले आणि काही अश्लील चित्रे टाकण्यात आले. यातून सावित्रीबाई या आमच्या आईला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. हा गुन्हा मेमध्ये घडला. आज जुलै महिना आहे.”
“सावित्रीबाईंविषयी आक्षेपार्ह लिहिणारा आरोपी का सापडत नाही?”
“मोठ्या राजकारण्यांविषयी काही लिहिलं गेलं की, २४ तासात सायबर पोलीस सक्रीय होतात आणि ते लिहिणाऱ्याला आकाश-पाताळ एक करून घेऊन येतात. मग सावित्रीबाईंविषयी इतकं आक्षेपार्ह लिहिल्यानंतर आजपर्यंत आरोपी का सापडत नाही?” असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी विचारला.