लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : सत्तेच्या खुर्चीसाठी सहा वर्षांपूर्वी त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना पायदळी तुडवले, हिंदुत्व सोडले, शिवसेनेचे नुकसान केले, आता आभाळ फाटले आहे. त्याला कुठे कुठे ठिगळ लावणार? अशी घणाघाती टीका शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे पक्षावर केली. ठाकरे गटाचे अनेक नेते, आमदार, पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

३१ ऑक्टोबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार उपमुख्यमंत्री वैद्याकीय सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या राज्याचा विकास करणे हेच महायुतीचे एकमेव लक्ष्य आहे. महायुतीमध्ये कोणतीही समांतर यंत्रणा नाही. उपमुख्यमंत्री वैद्याकीय सहायत्ता कक्षात वैद्याकीय मदतीचे जे अर्ज येतील, त्यांना मदत केली जाईल. यापूर्वी काहीजण मुख्यमंत्री असताना एकदाच मंत्रालयात आले होते, याची आठवणही शिंदे यांनी या वेळी करून दिली.

विकासविरोधी लोकांशी ‘वॉर’…

महाविकास आघाडीसारखा महायुतीचा केवळ खुर्चीचा कार्यक्रम नाही. महायुतीचा कार्यक्रम हा सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणे आणि त्यांना न्याय देणे असा आहे. राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सेवा प्रकल्पांचा आढावा घेणारी एकच ‘वॉर रूम’ आहे. नवीन ‘वॉर रूम’ झालेली नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांकडील विभागांचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा कक्ष ‘वॉर रूम’शी संलग्न आहे. महायुतीत ‘कोल्ड वॉर’ नाही तर ‘महाराष्ट्र विकासविरोधी लोकांशी वॉर’ आहे, असा टोला शिंदे यांनी लगावला.

Story img Loader