शिवसैनिकांच्या प्रार्थनेच्या बळावरच बाळासाहेबांच्या प्रकृतीत आश्चर्यकारक सुधारणा होत असून ते शिवसैनिकांसाठी ईश्वरी अवतार आहेत. लवकरच ते शिवसैनिकांना दर्शन देतील, अशी ग्वाही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना दिली.
बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असल्याचे, सुधारत असल्याचे शिवसेनेतर्फे दिवसभर सांगितले जात होते. सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद लक्षात घेता, बाळासाहेबांची प्रकृती किती वेगाने सुधारते आहे हे लक्षात येईल. बाळासाहेबांचे हृदयाचे ठोके, रक्तदाब आदी सर्वसाधारण आहे, असे राऊत यांनी सांगितले.बाळासाहेबांच्या प्रकृतीत आश्चर्यकारक सुधारणा होत आहे. त्यांच्यासाठी सर्वत्र प्रार्थना होत आहे. शिवसैनिक हेच बाळासाहेबांची ताकद व टॉनिक आहे. शिवसैनिकांची निष्ठा व श्रद्धा हे त्यांचे बलस्थान आहे व त्या बळावरच बाळासाहेबांची तब्येत सुधारत आहे. बाळासाहेबांच्या प्रकृतीत होणारी सुधारणा लक्षात घेता ते लवकरच शिवसैनिकांना दर्शन देतील, असे राऊत म्हणाले.तर बाळासाहेबांची प्रकृती सुधारत आहे पण धीम्या गतीने, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी त्यानंतर तासाभराने पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.     

Story img Loader