मुंबई : पाेट साफ न होणे, ओटीपोटीतील दुखण्याने त्रस्त असलेल्या सहा वर्षांच्या मुलाच्या पोटातून चेंडूच्या आकाराचा ट्युमर काढण्यात मुंबईमधील रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले. ही गाठ कर्करोगाची असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र ती गँग्लिओन्युरोमा नावाचा ॲड्रीनल (मूत्रपिंडावरील ग्रंथी) ट्युमरची असल्याचे लक्षात आले. साधारणपणे लाखात एका मुलामध्ये या प्रकारचा ट्युमर होत. असा हा दुर्मिळ ट्युमर काढून डॉक्टरांनी सहा वर्षांच्या मुलाच्या आयुष्यात आनंद परत आणला.

रायपूर येथील कुश अग्रवाल याला पोट साफ न होण्याचा आणि ओटीपोटात दुखण्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्याला स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या निदानामध्ये त्याच्या पोटामध्ये गाठ असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला मुंबईतील एस.एल. रहेजा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. कुशच्या पोटामधील गाठ चेंडूच्या आकाराची असून, तिच्यावर उपचार न केल्यास ती कर्करोगासाठी कारणीभूत ठरू शकते. असे डॉक्टरांनी कुशच्या पालकांना सांगितले. कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे समजल्यावर कुशच्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली.

यकृत आणि मूत्रपिंडाच्या मध्ये गाठ

गाठ यकृत आणि मूत्रपिंडांच्या मध्ये ओटीपोटीच्या भागात होती. शस्त्रक्रियेच्या दृष्टीने या भागातील गाठ ही आव्हानात्मक व क्वचित आढळते. या जागेमुळे शस्त्रक्रिया नाजूक व गुंतागुंतीची झाली होती. उजवीकडील ॲड्रीनल ग्रंथीमध्ये असलेली ही गाठ कॅन्सरची असल्याचा संशय डॉक्टरांना होता. ॲड्रीनल ग्रंथी मूत्रपिंडांच्या वर असते आणि चयापचय, रक्तदाब व शरीराद्वारे तणावाला दिला जाणारा प्रतिसाद आदी कार्यांचे नियंत्रण करणाऱ्या हार्मोन्सची निर्मिती करण्याची जबाबदारी या ग्रंथीवर असते. वैद्यकीय पथकाने रुग्णाचा पेट स्कॅनही केला असता ती गाठ अन्य कोणत्याही भागात पसरली नसल्याचे निदर्शनास आले. मेटास्टॅसिसची (पसरलेला कर्करोग) कोणतीही लक्षणे दिसत नसल्यामुळे गाठीची बायोप्सी न करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. मात्र, ही गाठ यकृत आणि मूत्रपिंड यांच्यामधील भागात असल्यामुळे शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. मात्र बालरोग शस्त्रक्रिया विभागातील कन्सल्टन्ट डॉ. राजीव रेडकर आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने कौशल्य आणि धोरणात्मक नियोजनाद्वारे गुंतागुंत असलेली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून गाठ काढली.

गाठ गँग्लिन्युरोमाची असल्याचे निदान

शस्त्रक्रियेअंती काढलेली गाठ ही गँग्लिन्युरोमाची असल्याचे अखेरच्या हिस्टोपॅथोलॉजिकल निदानाद्वारे स्पष्ट झाले. काेणतीही गुंतागूंत निर्माण न होता गाठ पूर्णपणे काढण्यात आली, तसेच किमोथेरपीची गरज भासली नाही. कुश आता पूर्णपणे बरा होण्याच्या मार्गावर आहे. अशा प्रकारची गाठ पुन्हा निर्माण होईल अशी कोणतीही लक्षणे नसल्याचे माहीमच्या एस. एल. रहेजा रुग्णालयातील बालरोग शस्त्रक्रिया विभागातील कन्सल्टन्ट डॉ. राजीव रेडकर यांनी सांगितले.

कुशच्या पोटातील गाठ कर्करोगाची असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविल्यावर झोप उडाली होती. मात्र डॉक्टरांनी केलेल्या समुपदेशामुळे मनाची तयारी करण्यास मदत झाली. वेळेत झालेले निदान, काळजीपूर्वक नियोजन आणि वैद्यकीय पथकाचे कौशल्य यामुळे कुशची प्रकृती बरी होत आहे, असे कुशचे वडील भावेश अग्रवाल यांनी सांगितले.