दाराला लोंबकळत, खच्चून भरलेल्या गर्दीत स्वतला कोंबत पनवेल-वाशीवरून मुंबई गाठणाऱ्या हार्बरवरील प्रवाशाला दिलासा देणारी योजना आखण्यात आली आहे. हार्बर मार्गावर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत असलेला ताण लक्षात घेऊन हा ताण कमी करण्यासाठी या मार्गावर बॅलार्ड इस्टेट येथून बीपीटीच्या जागेतून वडाळ्यापर्यंत नवीन मार्गिका बांधण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) हा प्रस्ताव मांडण्यात आला असून याबाबतचा प्रस्ताव मुंबई पोर्ट ट्रस्टकडे पाठवण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांंपासून हार्बर मार्गावर खारघर, कामोठे, खांदेश्वर, जुईनगर, सीवूड दारावे या स्थानकांच्या आसपासच्या लोकवस्तीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी हार्बरवर प्रवासी वाहतुकीचा ताण वाढू लागला आहे. मात्र, त्या तुलनेत या मार्गावरील उपनगरीय वाहतूक सेवा तितकीशी सक्षम नाही. त्यातच या मार्गावरील प्रवाशांना सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टांवर मध्य रेल्वेकडे सध्या तरी काहीच उपाययोजना नाही. वाढत्या लोकवस्तीच्या तुलनेत गाडय़ांची संख्या व इतर सुविधांमध्ये भर पडलेली नाही. सध्या हार्बर मार्गावरील सर्वच गाडय़ा १२ डब्यांच्या करून या मार्गावरील प्रवासी वाहन क्षमता ३३ टक्क्यांनी वाढवण्याचा विचार सुरू आहे. मात्र त्यापुढे जाऊन येत्या काही वर्षांत या मार्गावर वाढणाऱ्या वाहतुकीचा विचार करून या नव्या मार्गाचा प्रस्ताव आखण्यात आला आहे.
प्रस्ताव असा..
या प्रस्तावानुसार सध्या पनवेल किंवा वाशीहून मुंबईकडे येणाऱ्या गाडय़ा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडेच येतील. तर अंधेरी व वांद्रे आणि भविष्यात गोरेगाव येथे जाणाऱ्या गाडय़ांसाठी नवीन मार्गिका बांधण्यात येईल. ही मार्गिका बॅलार्ड इस्टेट येथून सुरू होईल. बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीवरून जाणारी ही मार्गिका वडाळा स्थानकाला जोडली जाईल आणि तेथून नेहमीच्या मार्गाने अंधेरीपर्यंत पोहोचेल. त्यामुळे अंधेरीहून येणाऱ्या गाडय़ा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला न येता बॅलार्ड इस्टेट येथेच जातील. परिणामी हार्बर मार्गावरील गाडय़ांची संख्या वाढवता येईल. एमआरव्हीसीच्या एका अधिकाऱ्याच्या मते यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासी क्षमतेत प्रतितास ६० हजारांनी वाढ होणार आहे आणि अंधेरीसाठीही एक वेगळी मार्गिका उपलब्ध झाल्याने या मार्गावरील प्रवाशांनाही दिलासा मिळेल.