राज्यात दुष्काळजन्य स्थिती असताना लाखो लिटर पाण्याची धुळवड करणाऱ्या आसाराम बापूंच्या होळी उत्सवाला यानंतर पोलीस परवानगी देणार नाहीत, असे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे पत्रकारांच्या विरोधात चिथावणीखोर भाषण करून आपल्या अनुयायांना भडकवणाऱ्या बापू यांच्या ध्वनिचित्रफितीची चौकशी करण्यासाठी एका उच्च अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येत असून, येत्या १५ दिवसांत अहवाल अपेक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती, नवी मुंबई मराठी पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असोशिएशन यांच्या वतीने मंगळवारी गृहमंत्र्यांची भेट घेण्यात आली. बापू यांच्या अनुयायांनी पत्रकारांवर हल्ला करून त्यांच्या सामानाची नासधूस केली. यामागे बापू आणि त्यांच्या सहकऱ्यांनी केलेली प्रक्षोभक प्रवचने कारणीभूत असल्याची बाब पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर पाटील यांनी यानंतर बापू यांच्या होळी उत्सवाला निदान होळीपर्यंत तरी परवानगी दिली जाणार नाही असे स्पष्ट केले. बापूंच्या होळी उत्सवात खासगी पाण्याचा वापर केला जाणार असेल तर पाण्याची नासाडी होते म्हणून पाबंदी करता येणार नाही; पण दुष्काळग्रस्त भागातील जनतेच्या भावनांशी आयोजक खेळत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे यानंतर त्यांच्या होळी उत्सवाला पोलीस परवानगी देणार नाहीत. त्याचप्रमाणे बापू आणि त्यांच्या समर्थकांनी केलेल्या भाषणाची संपूर्ण चौकशी केली जाणार असून, त्यात काही आक्षेपार्ह आढळून आल्यास बापू यांच्यावरही कारवाई करण्यास पोलीस मागेपुढे पाहणार नाही, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात रबाले पोलिसांनी २५ जणांना अटक केली असून, त्यांना वाशी न्यायालयाने बुधवापर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. यात बापूंच्या खासगी सुरक्षारक्षकांचा व आयोजकांचाही समावेश आहे.

Story img Loader