अनंत चतुर्दशीच्या दिवशी बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहणाऱ्या दहिसर नदीत गणेश विसर्जन करण्याचे प्रयत्न राजकीय नेते मंडळी करीत होती. मात्र, पर्यावरणप्रेमींनी कडाडून विरोध करून राजकारण्यांचा प्रयत्न हाणून पाडला. उच्च न्यायालयाने पर्यावरणाच्या रक्षणार्थ राष्ट्रीय उद्यानातून वाहणाऱ्या दहिसर नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई केली होती. त्यामुळे या परिसरातील अनेक नागरिकांनी कृत्रिम तलावात गणेश विसर्जन केले.
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दहिसर नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई आहे. गेल्या तीन – चार वर्षांत या नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन झालेले नाही. मुंबई महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावात मूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते. मात्र, यावर्षी उद्यानाच्या परिसरातील रस्त्यांवर ‘अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तींचे संजय गांधी उद्यानात होणार विसर्जन’ असे फलक लावण्यात आले होते. उद्याना प्रशासनाची परवानगी मिळाल्याचा दावा या फलकावर करण्यात आला होता. याबाबत ‘मुंबई मार्च’ या संघटनेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने उद्यानातून जाणाऱ्या दहिसर नदीतून गणपती विसर्जन करण्यास मनाई केली. यासह वन विभागाला आवश्यक ती कारवाई करण्याची मुभा दिली होती. तसेच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले होते.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उद्यान परिसरात एका ठिकाणी नदीच्या पात्रात पाणी अडवून तेथे गणेश विसर्जन करण्यात येत होते. मात्र यंदा गणेश विसर्जनास असलेली मनाई लक्षात घेऊन तशी व्यवस्थाच करण्यात आली नव्हती. उद्यानाचे प्रवेशद्वारही बंद करण्यात आले होते. त्यामुळे भाविकांना उद्यानत जाण्यास मार्ग उपलब्ध नव्हता. परिणामी, उद्यानातून जाणाऱ्या दहिसर नदीत गणेशमूर्तीचे विसर्जन झाले नाही, अशी माहिती पर्यावरणप्रेमींकडून देण्यात आली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्रीपर्यंत एकाही गणेशमूर्तींचे विसर्जन झाले नाही. उद्यानाचे प्रवेशद्वार बंद होते. तसेच दोन ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला होता. उद्यानाच्या प्रवेशद्वार आणि आतमध्ये पोलीस तैनात होते. – सोमनाथ घार्गे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १२